हजारो कोल्हापूरकरांनी पहाटे दिली चालण्याची वार्षिक परीक्षा
By संदीप आडनाईक | Published: December 31, 2023 06:22 PM2023-12-31T18:22:15+5:302023-12-31T18:22:48+5:30
'रंकाळा माझा श्वास,आरोग्यासाठी चालत राहणे माझा ध्यास'च्या गजरात रंकाळा परिक्रमा.
कोल्हापूर : 'चला चालूया आरोग्यासाठी, स्वतः सदृढ राहण्यासाठी' ही नवीन वर्षाची संकल्पना घेऊन हजारो नागरिकांनी रविवारी 'रंकाळा माझा श्वास, आरोग्यासाठी चालत राहणे माझा ध्यास'च्या गजरात रंकाळा परिक्रमा पूर्ण करत चालण्याची वार्षिक परीक्षा दिली. या उपक्रमाचे हे नववे वर्ष होते.
दरवर्षी कोल्हापूर वॉकर्स असोसिएशनतर्फे ३१ डिसेंबर रोजी चालण्याची वार्षिक परीक्षा घेण्यात येते. नऊ वर्षापूर्वी संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम चोपडे यांनी नाना गवळी आणि अजित मोरे यांच्या सोबतीने सुरू केलेला हा उपक्रम सातत्याने नवव्या वर्षीही मोठ्या उत्साहात पार पडला.
'चालूया आरोग्यासाठी' आणि 'स्वच्छ आणि सुंदर रंकाळा' ही या वर्षीची घोषणा होती. रंकाळा तलावासभोवती चालण्याच्या या परीक्षेस पहाटेची बोचरी थंडी असतानासुद्धा ३०० ते ४०० आबालवृद्धांनी पहाटे ३:३० वाजल्यापासूनच हजेरी लावत आपला सहभाग नोंदवला. पहाटे ४ वाजता कोल्हापूर अर्बन बँकेचे संचालक बाबुराव मकोटे, अल्ट्राटेक सिमेंटचे अविनाश जेऊरकर, संस्थेचे संचालक नाना गवळी, महिपती संकपाळ यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घघाटन झाले. संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम चोपडे, उपाध्यक्ष परशुराम नांदवडेकर, संस्थेचे संचालक नाना गवळी, उदय गायकवाड, राजेश पाटील, सुनील माने, अजित मोरे यांच्यासह इतरांनी रंकाळा तलावा भोवतीचे एकूण २१ किलोमिटरचे हे अंतर ३ तासात चालत पूर्ण केले. कोल्हापूर मास्टर ॲथलेटिक असोशिएशनचे सचिव पी. टी. पाटील यांनी धावत एक तास तीस मिनिटात पाच परिक्रमा पूर्ण केल्या तर संस्थेचे सचिव महिपती संकपाळ, मॅरेथॉन धावपटू उदय महाजन, शुभम पाटील यांनी धावत दोन तासांत पाच परिक्रमा पूर्ण केल्या.