उठसूठ बेताल आरोप करण्यापेक्षा, एका व्यासपीठावर या...!
By admin | Published: April 16, 2015 12:27 AM2015-04-16T00:27:29+5:302015-04-17T00:08:14+5:30
महादेवराव महाडिक यांचे आव्हान : ‘राजाराम’चा कारभार पारदर्शकच, स्वत:च्या कारखान्याची तपासणी करा; सभासदांना पेन्शन योजना सुरू करणार
अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या ‘राजाराम’ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रणांगण आता चांगलेच तापले आहे. आमदार महादेवराव महाडिक यांच्या सत्तारूढ राजर्षी शाहू पॅनेल व माजी मंत्री सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू ‘परिवर्तन’ पॅनेलमध्ये सामना रंगला आहे. यानिमित्त सत्तारूढ गटाचे नेते आमदार महादेवराव महाडिक यांनी पॅनेलप्रमुख या नात्याने मांडलेली ‘माझी भूमिका’....
प्रश्न - कारखान्याचा कारभार पारदर्शक आहे, तर भ्रष्टाचाराचे आरोप कसे?
उत्तर - विरोधक गेली अनेक वर्षे शिळ्या कढीला ऊत आणत आहेत. कारखान्याचा कारभार हा अतिशय पारदर्शक आणि सभासद शेतकरी यांच्या हिताचा असाच सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून साखर उद्योगावर अनेक संकटे आल्याने अनेक कारखाने बंद पडले. मात्र ‘राजाराम’ कारखाना जुना असूनही तो उत्तमरित्या चालू आहे. प्रत्येक वर्षी सरासरी ४ लाखांच्या वरती गाळप केले जाते. गेल्या वर्षी कारखान्याने जुनी मशिनरी बदलून अद्ययावत तंत्रज्ञान असलेली मशिनरी कमी खर्चात बसवली. त्यामुळे ३८०० ते ४००० मेट्रीक टन गाळप प्रतिदिन करू शकलो. तरीही आमच्यावर आरोप होत आहेत. ७० ते ७५ कि. मी. अंतरावरून तसेच १२२ गावांतून आम्ही ऊस आणतो. हे विरोधकांनी विसरू नये. उठसूठ आरोप करत बसू नये. हिम्मत असेल तर त्यांनी एका व्यासपीठावर येऊन समोरासमोर आरोप करावेत. महाडिक त्यांना त्यावेळी उत्तर देतील. व्यासपीठाचे ठिकाण, वेळ, तारीख त्यांनीच ठरवावी.
प्रश्न- निवडणूक ‘राजाराम’ची असताना डी. वाय. पाटील कारखान्यावर आरोप कसे काय?
उत्तर - ‘राजाराम’च्या कारभारावर आरोप करणाऱ्यांनी आधी आपल्या कारखान्यात काय चाललंय ते पहावे. या कारखान्यात कार्यक्षेत्रातील कमी आणि पुणा, मुंबई, कोल्हापूर आणि इतर भागातील सभासदच जास्त आहेत. वार्षिक सभेच्या अहवालाच्या प्रतीही काही मोजक्याच काढल्या जातात.
प्रश्न - कारखान्याचा कारभार काटकसरीचा आहे म्हणजे नेमका कसा?
उत्तर- कारखान्याने आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांची कर्जे काढून त्याची परतफेड केली आहे. सद्य:स्थितीत कारखान्यावर एकही रुपयाचे कर्ज नाही. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतात. इतर देय रकमाही वेळेवर दिल्या जातात. कारखान्याने अवलंबलेल्या पर्चेस सिस्टिममुळे कारखान्याने खरेदी केलेले दर हे साखर आयुक्तालयाच्या दरसूचीपेक्षा अत्यंत कमी आहेत. त्यामुळे कारखान्यात उधळपट्टी सुरू आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. कारखान्यास सुरुवातीला शासनाकडून मिळालेले शेअर भांडवलही यापूर्वीच संपूर्ण परतफेड केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव असा कारखाना आहे. इतका पारदर्शी कारभार आम्ही करीत आहोत. कारखान्याच्या कारभाराची कोणताही सभासद केव्हाही तपासणी करू शकतो.
प्रश्न - ऊस उत्पादक शेतकरी सभासदांसाठी भविष्यात काय योजना आहेत?
उत्तर - कष्टकरी ऊस उत्पादक सभासदांसाठी कारखान्यामार्फत पेन्शन योजना चालू करण्याची आमची भूमिका आहे. त्यासाठी काही कालावधी जावा लागेल. सरकारची त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. भविष्यात अशी योजना राबविणारा ‘राजाराम’ पहिला साखर कारखाना असेल. याशिवाय ठिबक योजना राबविण्यात येणार आहे. ऊस विकास योजना सध्या राबविण्यात आली आहे. कारखान्याला कायमचा व हक्काचा ऊस उपलब्ध होणेसाठी कारखाना कार्यक्षेत्रातील काही गावात जलसिंचन योजना राबविल्या आहेत. स्वच्छ आणि पारदर्शक कारभारामुळे सभासद आमच्या पाठीशी आहेत. ते पुन्हा आमच्याकडेच सत्ता देतील, यात शंका नाही, असेही आमदार महाडिक शेवटी म्हणाले.
- रमेश पाटील, कसबा बावडा
(उद्याच्या अंकात माजी मंत्री
सतेज पाटील यांची मुलाखत)