हद्दवाढप्रश्नी मुंबईत मंगळवारी बैठक

By admin | Published: August 24, 2016 12:59 AM2016-08-24T00:59:52+5:302016-08-24T01:00:10+5:30

निर्णय शक्य : समर्थक, विरोधकांचे उपोषण स्थगित

Thousands of questions in the meeting Tuesday in Mumbai | हद्दवाढप्रश्नी मुंबईत मंगळवारी बैठक

हद्दवाढप्रश्नी मुंबईत मंगळवारी बैठक

Next

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न चिघळला असून, याबाबत समर्थक आणि विरोधकांनी आमरण उपोषणाची तयारी केली होती. या प्रश्नी सकारात्मक तोडग्यासाठी दोन्हीही बाजूंच्या नेत्यांची मंगळवारी (दि. ३०) मुंबईत बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हद्दवाढ समर्थक आणि विरोधकांनी नियोजित उपोषणाचे आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली.
येत्या मंगळवारी मुंबईत दोन्हीही बाजूंच्या नेत्यांना चर्चेसाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री पाटील यांनी पाचारण केल्याने या बैठकीनंतर अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
शहराच्या हद्दवाढ प्रश्नाबाबत सर्वपक्षीय शहर हद्दवाढ कृती समिती आणि हद्दवाढविरोधी कृती समिती यांनी परस्परविरोधी आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. काही दिवस दोन्हीही बाजूंनी एकमेकांवर टीकेचा भडिमार सुरू आहे. ३१ आॅगस्टपूर्वी हद्दवाढीबाबत अधिसूचना न निघाल्यास त्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक असल्याने हद्दवाढ रेंगाळणार, हे निश्चित होते. त्यामुळे हद्दवाढीबाबत समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये आंदोलनात धार आली. त्यामुळे शहर हद्दवाढ सर्वपक्षीय कृती समितीने २४ आॅगस्टपासून आमरण उपोषणाची घोषणा केली होती; तर त्याला चोख उत्तर देण्यासाठी प्रस्तावित १८ गावांतील ग्रामस्थांनी व नेत्यांनी २५ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचीही घोषणा केली होती. त्यामुळे आंदोलन चिघळण्याच्या स्थितीत होते.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांंनी बैठक बोलाविली. बैठकीस दोन्हीही बाजूंच्या नेत्यांना सायंकाळी ऐनवेळी
निरोप देऊन बैठकीसाठी पाचारण केले होते.
बैठकीत, हद्दवाढसमर्थक व विरोधक यांच्यात चर्चा झाली. दोन्हीही बाजूंच्या चर्चेनंतर हद्दवाढ समर्थकांनी आंदोलन स्थगित करण्याबाबत प्रथम विरोध दर्शविला. आम्ही हक्क मागतो आहोत, विनाकारण शहरावर भार सहन करणार नाही, असे त्यांनी सुनावले. त्याचवेळी आमच्याही जमिनी जात असल्याची तक्रार हद्दवाढविरोधी नेत्यांनी करून त्यांनीही आंदोलन मागे घेण्यास प्रथम नकार दिला.
काही वेळानंतर हद्दवाढ समर्थकांनी बैठकीतून बाहेर जाऊन चर्चा केली. तसेच त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज, बुधवारपासून सुरू होणारे उपोषण तूर्त स्थगित करू, असे पत्रकारांना सांगितले. समर्थकांनी आंदोलन स्थगित केल्याने विरोधकांनीही मुख्यमंत्री आणि पालकमंत्री पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत आंदोलन स्थगित करण्याची घोषणा पत्रकारांशी बोलताना केली.
सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीतर्फे महापौर अश्विनी रामाणे, निमंत्रक आर. के. पोवार, उपमहापौर शमा मुल्ला, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर, बाबा पार्टे, सतीशचंद्र कांबळे, अशोक जाधव, किशोर घाटगे, नामदेव गावडे, बी. एल. बर्गे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, महेश जाधव, आदी सहभागी झाले; तर विरोधी कृती समितीतर्फे निमंत्रक नाथाजी पोवार, जिल्हा परिषदेचे सदस्य बाजीराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण, पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खवरे, राष्ट्रवादीचे मधुकर जांभळे, शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, सुरेश चव्हाण, प्रकाश चव्हाण, सरदार मुल्ला, आदी चर्चेत सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)


जिल्हाधिकाऱ्यांनी
केले चकित
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीत १८ गावे आणि दोन एमआयडीसी यांचा समावेश करावा यासाठी गेली काही महिने आंदोलन सुरू आहे, तर विरोधकांनीही ही गावे हद्दवाढीत समाविष्ट करू देणार नसल्याबाबत तितक्याच तीव्रतेने विरोध करून आंदोलने केली आहेत. प्रस्तावित १८ गावे शहरात समाविष्ट झाल्यानंतर शहराची लोकसंख्या किती होणार याबाबत शासकीय पातळीवर व आंदोलनातून अनेकवेळा विचारमंथन झाले आहे तरीही मंगळवारी हद्दवाढ विरोधकांकडून या प्रस्तावित १८ गावांची लोकसंख्या किती? असा प्रश्न करून जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली तसेच या गावांच्या विकासासाठी १४ व्या वित्त आयोगातून आलेल्या निधींबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन मंडळाच्या बैठकीत नियोजन केले जाते पण त्याबाबतही जिल्हाधिकारी बहुधा अनभिज्ञ होते. १८ गावांसाठी किती निधी आला, असाही प्रश्न हद्दवाढ विरोधी नेत्यांकडे उपस्थित करून त्यांनी साऱ्यांना चकित केले.

आज बैठका
हद्दवाढ प्रश्नाबाबत दोन्हीही बाजूंनी नियोजित आमरण उपोषणाचे आंदोलन स्थगित केले. त्यानंतर विचारविनिमय करण्यासाठी हद्दवाढ कृती समितीच्यावतीने आज, बुधवारी दुपारी १२ वाजता महानगरपालिकेत कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे, तर हद्दवाढ विरोधी कृती समितीच्यावतीनेही आजच दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे.

Web Title: Thousands of questions in the meeting Tuesday in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.