जिल्ह्यात दुधाची तीन हजार कोटींची उलाढाल
By admin | Published: June 1, 2016 12:52 AM2016-06-01T00:52:44+5:302016-06-01T00:55:01+5:30
प्रमुख बाजारपेठेवर पकड : सात लाख शेतकऱ्यांना हक्काचा आधार--जागतिक दूध दिन
राजाराम लोंढे -- कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये साखर उद्योगाच्या बरोबरीने महत्त्वाची भूमिका दुग्ध व्यवसायाने बजावली आहे. सात लाखांपेक्षा अधिक दूध उत्पादक शेतकऱ्यांना या व्यवसायाने आधार दिला असून, केवळ दुधाची वार्षिक उलाढाल तीन हजार कोटी आहे. येथील दूध संघांनी गुणवत्तेच्या बळावर मुंबईसह प्रमुख बाजारपेठांवर चांगलीच पकड मिळवली आहे. जिल्ह्यात सहकारी व खासगी मिळून २० हून अधिक साखर कारखान्यांचे जाळे पसरल्याने येथे ऊस उत्पादन हाच शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय ठरला. शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय पुढे आला; पण निसर्गाचा लहरीपणा व ऊसदराची अनिश्चितता यामुळे शेतकरी अडचणीत येऊ लागला. या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना दूध व्यवसायाने खऱ्या अर्थाने दिलासा दिला. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने दर दहा दिवसाला दुधाचे पैसे शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केल्याने आपोआपच या व्यवसायाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला. ‘गोकुळ’, ‘वारणा’ पाठोपाठ ‘मयूर’, ‘महालक्ष्मी’,‘समृद्धी’ दूध संघाने या व्यवसायात उडी घेतली. प्रशासनातील चुकीच्या निर्णयाने ‘मयूर’,‘समृद्धी’ व ‘महालक्ष्मी’ अडचणीत आल्याने येथील दूध व्यवसायावर परिणाम होईल असे वाटत होते; पण ‘गोकुळ’ व ‘वारणा’च्या माध्यमातून येथील उत्पादक पुन्हा ताकदीने उभा राहिला. त्याला ‘शाहू’ व ‘स्वाभिमानी’ या दोन संघांनी चांगली साथ दिली आहे. जिल्ह्यात सध्या २५ लाख लिटर दुधाचे उत्पादन आहे. त्यापैकी जवळपास दहा लाख लिटर घरगुती वापराबरोबर उपपदार्थांसाठी वापरले जाते तर १५ लाख लिटरची विक्री होते. सात लाख दूध उत्पादक या संघांशी संलग्न आहेत. मुंबईसह राष्ट्रीय पातळीवरील दुधाची विशेष करून म्हैस दुधाची वाढलेली मागणी पाहता सर्वच संघांनी दूध वाढीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कोल्हापूरच्या दुधाने आपल्या गुणवत्ता व दर्जेदार पणाच्या जोरावर मुंबई, गोवा, पुणे, नाशिक आदी प्रमुख बाजारपेठा काबीज केल्या आहेत.
दूध दरातही कोल्हापूर आघाडीवर
येथे दर दहा दिवसाला शेतकऱ्यांच्या हातात पैसे देण्याची व्यवस्था दूध संघांनी केलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या तुलनेत कोल्हापुरातील दुधाचे दर जास्त असल्याने येथे दूध व्यवसायाला बळकटी मिळाली आहे.
चवदारपणामुळेच ‘भुरळ’!
कोल्हापूरचा गूळ असो अथवा दूध, त्याला कमालीचा गोडवा आहे. मुळात येथील माती व पाणीच कसदार आहे. त्याचा परिणाम येथील शेती उत्पादनात दिसून येत असून, कोल्हापुरी दूध व उपपदार्थांतील कणदार व चवदारपणाने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली आहे.
महाराष्ट्रात रोज दोन कोटी २० लाख लिटर दूध संकलन होते. त्यापैकी १० टक्के म्हणजे २५ लाख लिटर संकलन एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात होते. दूध उत्पादनवाढीला येथील भौगोलिक परिस्थितीबरोबर संघटन कारणीभूत आहे.
- डी. व्ही. घाणेकर, (कार्यकारी संचालक, गोकुळ)