दहा हजारांच्या वर मते तरीही गुलालाची हुलकावणी
By admin | Published: March 2, 2017 01:19 AM2017-03-02T01:19:26+5:302017-03-02T01:19:26+5:30
जिल्हा परिषद निवडणूक : अठराजणांच्या पदरात पराभव; बाराजणांना दिला अपक्षांनी झटका
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभवाची चव अनेकांनी चाखली आहे, पण दहा हजारांपेक्षा अधिक मते घेऊनही अठराजणांना गुलालाने हुलकावणी दिली. एवढेच नव्हे तर बारा हजारापेक्षा अधिक मते घेऊनही सातजणांच्या पदरात पराभव पडला आहे. दुसऱ्या बाजूला तब्बल बारा मतदारसंघात दिग्गजांना अपक्षांनी झटका दिला आहे.
अध्यक्षपद खुले असल्याने नेत्यांचे डझनभर वारसदार व पहिल्या फळीतील नेते रिंगणात उतरले होते. प्रत्येक इच्छुकाकडे विजयाचे गणित असते, त्यानुसारच पत्ते टाकले जातात पण काहीवेळा सगळे पत्ते बरोबर पडतातच असे नाही, त्यामुळे एखादा अपक्षही विजयाचे गणित बिघडून टाकतो. बारा मतदारसंघातील काठावर पराभूत उमेदवार व अपक्ष यांच्या मताचा ताळमेळ घातला तर हे लक्षात येते. नेसरी मतदारसंघात शिवसेनेचे संग्राम कुपेकर यांचा १९८ मतांनी पराभव झाला. अपक्ष सुरेश पाटील यांना २१३, नारायण वार्इंगडे यांनी २०५ असे मते घेतली. माणगावमध्ये महेश पाटील यांना २४५ मतांनी पराभव झाला आणि रामचंद्र कांबळे ११७ तर संतोष पाटील यांनी ७१६ मते घेतली बोरवडे मतदारसंघात वीरेंद्र मंडलिक यांचा १७९ मतांनी पराभव झाला. साताप्पा कांबळे ७६ तर किशोरकुमार चौगले यांनी ५९ मते घेतली. आकुर्डे मतदारसंघात प्रकाश पाटील यांनी ७२१ घेतली आणि शाहू आघाडीचे मधुआप्पा देसाई यांचा २८५ मतांनी पराभूत झाले. यवलूजमध्ये दीपिका कांबळे व वैशाली भोमकर यांनी २४० मते घेतली आणि संगीता काशीद यांचा ६५ मतांनी पराभव झाला. कोतोलीत सागर सणगर, संदीप खवळे व नामदेव चौगले यांनी ६९१ मते घेतली आणि अजित नरके यांचा १८१ मतांनी पराभव झाला. हे तिघेही नरके यांच्या बालेकिल्याततील अपक्ष आहेत.
शियेमध्ये रोहिणी कामत (५१७), सुरेखा (५३०) व राणी देवकुळे (४४७) म्हणजेच तीन अपक्षांनी १५९४ मते घेतली आणि सुषमा सातपुते १४३ मतांनी पराभूत झाल्या. उचगावात चंद्रकांत नागांवकर (१२८), सागर भोसले (५५), देवदत्त माने (४८५), स्वप्निल माने (३०), विजय लांडगे (१७७) या पाच जणांनी तब्बल ८७५ मते घेतली आणि सतीश भोसले यांना फटका बसला. निगवे खालसामध्ये मनीषा बोटे यांचा ३४७ मतांनी पराभव झाला. तर कविता चव्हाण (१२९) व ‘शेकाप’च्या राजश्री ढवण (५९६) मते घेतली. दत्तवाडमध्ये सुनील लगड (५२५) व विकास पाटील (२५२) यांनी ७७७ मते घेतली आणि संताजी घोरपडे ७७८ मतांनी पराभूत झाले. कौलवमध्ये अरुण पाटील यांनी २७३३, दीपक पाटील यांनी १८२२ मते घेतली आणि संजय कलिकते १४८६ मतांनी पराभूत झाले. नांदणीत चिदानंद मेंडीगीरे यांनी ४९१ मते घेतली. शेखर पाटील ६ मतांनी पराभूत झाले आहेत. (प्रतिनिधी)
६८ जणांना पाचशेच्या आत मते
जिल्हा परिषदेला पाचशे पेक्षा कमी मतदान पडलेले ६८ उमेदवार आहेत. सर्वाधिक करवीरमधील १७, सर्वांत कमी गडहिंग्लजमधील दोन आहेत. राधानगरी व आजरा तालुक्यात एकही उमेदवार पाचशे मतांच्या आत नाही. सर्वांत कमी म्हणजे ३७ मते प्रदीप माकणे (रेंदाळ) यांना मिळाली आहेत. दहा हजारांपेक्षा अधिक मते तरीही पराभव
रणवीर गायकवाड, अक्षय पाटील, महादेव पाटील, अशोक चराटी, अमर पाटील, भीमराव साठे, समृद्धी पाटील, अजित नरके, वेदांतिका माने, महावीर गाट, वृषाली पाटील, वीरेंद्र मंडलिक, अर्चना पाटील, उज्ज्वला घाटगे, सुरेश सातपुते, मनीषा बोटे, सुजाता शिंदे, आरती तायशेटे यांचा समावेश आहे.
साडेचार हजारांचा विजयी
सर्वांत कमी ४५९३ मते घेऊन तिसंगीतून काँग्रेसचे भगवान पाटील विजयी झाले तर बोरवडेत तब्बल १३ हजार ४१८ मते घेऊनही वीरेंद्र मंडलिक यांना पराभव पत्करावा लागला.