सदोष नोंदणीमुळे हजारो कामगार लाभापासून वंचित
By Admin | Published: May 29, 2014 01:12 AM2014-05-29T01:12:17+5:302014-05-29T01:12:26+5:30
व्यापक सर्व्हे गरजेचा : जिल्ह्यात २६,७०० बांधकाम कामगारांची नोंद
भारत चव्हाण ल्ल कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायात काम करणार्या कामगारांची नोंदणी सदोष पद्धतीने झाली असल्याने राज्य सरकारच्या कामगार मंत्रालयातर्फे देण्यात येणार्या विविध योजनांपासून हजारो कामगारांना वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. याबाबत तक्रारी केल्यानंतरही त्याची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे व्यापक प्रमाणात सर्व्हे होऊन जोपर्यंत नोंदणी केली जाणार नाही तोपर्यंत कामगारांसाठी चांगल्या योजना असूनही लाभार्थी नसतील अशी परिस्थिती राहील. राज्यातील बांधकाम कामगारांच्या हितासाठी राज्य सरकारने महाराष्टÑ इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळामार्फत कामगारांच्या कल्याणासाठी शिक्षण, विमा, सुरक्षाविषयक विविध योजना राबविण्यात येत आहेत. कामगार मंडळाकडे सध्या १९८९ कोटी रुपयांचा निधी उपकराच्या रूपाने जमा झाला असून त्यातूनच या योजनांची अंमलबजावणी होणार आहे. राज्यात १ लाख ७८ हजार ५१६ बांधकाम कामगारांची नोंदणी झाली असून त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील २६ हजार ७०० कामगारांचा समावेश आहे. परंतु नोंदणीची पद्धत चुकीची असल्याने नोंदणी सदोष झाली असल्याची तक्रार केली जात आहे. मुळात बांधकाम कामगार हे कमी शिकलेले,अडाणी असतात. त्यामुळे नोंदणी कशी करायची असते, कोठे करायची असते आणि त्याबाबतचे निकष काय आहेत हे त्यांना कळत नाही. त्यामुळेच जिल्ह्यातून नोंदणी कमी झाल्याच्या तक्रारी होत आहेत. बांधकाम कामगारांसाठी काम करणार्या काही संघटना जिल्ह्यात आहेत. परंतु त्यांना कोणत्या योजना राबविल्या जात आहेत. नोंदणी कशी केली आहे यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती सरकारी यंत्रणेद्वारे देण्यात येत नाही, अशीही तक्रार आहे.