ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई यांना धमकी

By admin | Published: April 19, 2016 12:50 AM2016-04-19T00:50:34+5:302016-04-19T00:50:57+5:30

निनावी पत्र : ‘सनातन’ धर्माला विरोध नको; पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

Threatens senior journalist Subhash Desai | ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई यांना धमकी

ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई यांना धमकी

Next

कोल्हापूर : येथील ज्येष्ठ पत्रकार व धर्मपरंपरेचे चिकित्सक अभ्यासक डॉ. सुभाष देसाई यांना सोमवारी दुपारी धमकी देणारे निनावी पत्र आले. त्यांनी तातडीने पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याकडे तक्रार केली असून त्यांनी दोन दिवसांत या पत्राचा छडा लावू, असे
आश्वासन दिले. पत्रातील भाषा गंभीर असून ‘नशिबाने एक देसाई वाचली, दुसऱ्या देसाईचे नशीब साथ देईलच असे नाही’ असा गर्भित
इशारा त्यामध्ये दिला आहे. अंबाबाई गाभारा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र आल्याने खळबळ उडाली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनाही दोन महिन्यांपूूर्वी ‘तुम्हाला पानसरे माहीत आहेत का,’ अशी विचारणा करणारे पत्र आले होते. देसाई यांना त्यांच्या सिंहवाणी पब्लिकेशन शिवाजी स्टेडियम, गाळा नंबर १०२, कोल्हापूर या पत्त्यावर सोमवारी हे पत्र मिळाले; परंतु त्यावर पोस्टाच्या शिक्क्याची तारीख मात्र १६ एप्रिल आहे.
पत्रात म्हटले आहे, ‘महालक्ष्मी ही महालक्ष्मी नसून अंबाबाई आहे शिवाय ती शिवपत्नी आहे, विष्णुपत्नी नाही असे जे तुमचे म्हणणे आहे ते तुमच्यापुरतेच ठेवा. याला तुम्ही प्रबोधन वगैरे म्हणत असाल, पण असले प्रबोधन करणाऱ्यांचा शेवट कोल्हापुरात कसा झाला आहे ते सांगायला नको. साळोखे नगरातील घरी तुम्ही एकटेच असता. त्यामुळे आम्हाला तुमची काळजी वाटते. आॅफिसमध्येही जरा सांभाळून राहत जा. कारण आजूबाजूचे लोकही मदत करतील असे वाटत नाही.’
देसाई यांना हे पत्र मिळाल्यावर त्यांच्याही मनात भीती निर्माण झाली. त्यांनी दुपारीच जाऊन पोलिस अधीक्षक देशपांडे यांची भेट घेतली व पत्राची प्रत त्यांना सादर केली. पोलिस अधीक्षकांनी सीआयडीच्या अधिकाऱ्यांना बोलावून पत्राची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. हे पत्र खरेच गंभीर घेण्यासारखी बाब आहे का, कुणीतरी भुरट्याने पाठविले असेल, अशीही विचारणा देसाई यांनी केली. त्यावर तुम्ही ही बाब गंभीरपणे घेऊन पोलिसांपर्यंत आला हे चांगले झाले, अशी प्रतिक्रिया देशपांडे यांनी व्यक्त केली. देसाई हे मूळचे गारगोटीचे असून सन १९६९ पासून पत्रकारितेत आहेत. प्रणव त्रैमासिक व सिंहवाणी दैनिकाचे संपादक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता, पीटीआय, टाईम्स आॅफ इंडिया अशा वृत्तसंस्थांत त्यांनी काम केले आहे. त्यांनी गेल्यावर्षी ‘अंबाबाई की महालक्ष्मी’ अशी पुस्तिका लिहिली आहे. त्यात अंबाबाई देवीचे खरे रूप मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही पुस्तिका प्रसिद्ध झाल्यावरही त्यांच्याकडे दोन सनातनी तरुण कार्यालयात जाऊन इशारा देऊन गेले होते परंतु देसाई यांनी त्यास फारसे महत्त्व दिले नाही. दोन महिन्यांपूर्वी शाहू स्मारकला झालेल्या व्याख्यानात त्यांनी ‘रामायण-महाभारत वाचण्यापेक्षा फुटबॉल खेळा, असे स्वामी विवेकानंद सांगत होते,’ असा संदर्भ दिला होता. तेच वाक्य ‘अंनिस’चे कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी आपल्या फेसबुक पेजला वापरल्यावर त्यांनाही ‘तुम्हाला पानसरे माहीत आहेत का..?’ अशी विचारणा करणारे पत्र आले होते.


अदखलपात्र गुन्हा दाखल
सुभाष देसाई यांनी सोमवारी रात्री जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांची भेट घेऊन धमकी पत्राच्या अनुषंगाने अज्ञात व्यक्तींच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी ‘कलम १५५’ फौजदारी दंडसंहिता कलमाद्वारे (ठार मारण्याची धमकी) अदखलपात्र गुन्हा दाखल केला. यावेळी देसाई यांच्यासोबत मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, स्वाभिमानी संभाजी ब्रिग्रेडचे उमेश पवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, अंबाबाई मंदिर पुजारी हटावो संघर्ष समितीचे दिलीप पाटील, विजय पाटील, संभाजी पवार, संदीप बोरगांवकर, अनिकेत सावंत, उमेश पवार, नीलेश चव्हाण, रणजित चव्हाण, अभिषेक मिठारी, जितेंद्र पाडेकर, प्रवीण राजिगरे, रणजित आरडे, सचिन पाटील, सुविश्व तोंदले, प्रकाश चौगुले, संदीप पाटील, स्वप्निल यादव, दिलीप पाटील, विकास पाटील, आदी उपस्थित होते.

आमच्या तीन
गोळ््यांनी अचूक वेध
‘सनातन धर्माला, सनातन परंपरेला आणि पुरोहितांना विरोध करू नका. आमच्या तीन गोळ््यांनी अचूक वेध घेतलाय. चौथ्या गोळीवर स्वत:चे नाव लिहून घेण्याचा अट्टाहास सोडा. नशिबाने एक देसाई वाचली, दुसऱ्या देसार्इंचे नशीब साथ देईलच असे नाही,’ असेही पत्रात म्हटले असून शेवटी ‘हितचिंतक’ असा उल्लेख आहे.

Web Title: Threatens senior journalist Subhash Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.