महापौर समर्थकांकडून ठार मारण्याची धमकी

By admin | Published: February 4, 2015 01:01 AM2015-02-04T01:01:52+5:302015-02-04T01:02:04+5:30

तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र : जामिनावर आज निर्णय

Threats to be killed by mayor supporters | महापौर समर्थकांकडून ठार मारण्याची धमकी

महापौर समर्थकांकडून ठार मारण्याची धमकी

Next

कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी लाच प्रकरणातील तक्रारदार संतोष पाटील यांना माळवी समर्थकांकडून ठार मारण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे पाटील यांनी महापौर माळवी व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या जीवितास धोका असल्याचे प्रतिज्ञापत्र वकिलामार्फत न्यायालयात सादर केले. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. दरम्यान, लाच प्रकरणातील संशयित आरोपी महापौर तृप्ती माळवी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवारी (दि. ३) पूर्ण झाल्याने सुनावणीचा अंतिम निकाल विशेष जिल्हा न्यायाधीश के. डी. बोचे बुधवारी (दि. ४) देणार असल्याची माहिती लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांनी दिली.
महापौरांचा जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळल्यास त्यांना बुधवारी लगेचच अटक होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. माळवी यांचा चौकशी जबाब अद्याप अपुरा आहे. जबाबासाठी त्यांना सोमवारी (दि. २) लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते; परंतु रक्तदाब वाढल्याने त्या रुग्णालयात दाखल झाल्या. त्यामुळे त्यांच्या व्हॉईस रेकॉर्डिंगची (आवाजाची) तपासणी अद्याप झालेली नाही. तपासाच्या दृष्टीने ती घेणे आवश्यक आहे. या संपूर्ण घटनेमध्ये महापौर माळवी यांना अटक होऊन पोलीस कोठडी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांचा जामीन अर्ज नामंजूर करावा, असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील दिलीप मंगसुळे यांनी मांडला.
महापौर माळवी यांच्यातर्फे अ‍ॅड. प्रशांत देसाई यांनी अटकपूर्व जामीन मंजुरीचा अर्ज विशेष जिल्हा न्यायाधीश बोचे यांच्याकडे सोमवारी सादर केला होता. त्यावेळी देसार्इंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश बोचे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तपासी अधिकारी उदय आफळे व पद्मा कदम यांना चौकशी अहवाल मंगळवारी (दि. ३) न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पद्मा कदम यांनी मंगळवारी सकाळी जिल्हा सरकारी वकील दिलीप मंगसुळे यांच्यातर्फे अहवाल सादर केला.
दुपारी सुनावणीस सुरुवात झाली. महापौरांचे वकील देसाई यांनी महापौरांचा चौकशी जबाब लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी घेतला आहे. त्याचबरोबर त्यांच्या घराची झडती घेतली आहे. त्यावेळी आक्षेपार्ह काहीही आढळले नाही तसेच त्या विधवा असून, त्यांना दोन शाळकरी मुले आहेत. घाणेरड्या राजकारणातून त्यांना मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेने त्यांना मानसिक धक्का बसला असून त्यांची प्रकृती जास्तच खालावली आहे. महापौर हे उच्चपद असून तपासासाठी त्या हजर राहून पोलिसांना सहकार्य करतील, त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज मंजूर करावा, असा युक्तिवाद मांडला.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायाधीश बोचे यांनी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अंतिम निर्णय दिला जाईल, असे सांगितले. त्यामुळे आरोपींच्या बाजूचे वकील माळवी समर्थक न्यायालयाच्या आवारात थांबून होते, तर लाचलुचपत विभागाचे कर्मचारीही न्यायालयाच्या बाहेर
थांबून होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी निर्णयाबाबत न्यायाधीशांना विनंती केली असता त्यांनी सुनावणीचा निर्णय ‘जैसे थे’ ठेवला असून, तो बुधवारी दिला जाईल, असे सांगितले. निकालानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे तपासी अधिकारी पद्मा कदम यांनी सांगितले. (प्रतिनि

ठराव आॅक्टोबरमध्येच
तक्रारदार संतोष पाटील यांच्या जागेसंदर्भात १० आॅक्टोबर २०१४ रोजी ठराव पास झाला असून, त्यावर महापौर माळवी यांची सही आहे. अंतिम मंजुरी ही प्रशासनाकडून घ्यायची असते, असे असताना पाटील यांना महापौरांच्या दालनात जायची काय गरज होती, अशी विचारणा माळवी यांच्या वकिलांनी न्यायालयात केली.
दोन तास चर्चा
तपासी अधिकारी पद्मा कदम यांनी मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास जिल्हा सरकारी वकील दिलीप मंगसुळे यांची त्यांच्या कक्षात भेट घेतली. यावेळी चौकशी अहवालावर त्यांनी दोन तास चर्चा केली.
महापौर माळवी रुईकर कॉलनीतील रुग्णालयात
महापौर माळवी यांचा रक्तदाब कमी-जास्त होत असल्याने त्यांना मंगळवारी सकाळी कार्डिओग्रामच्या चाचणीसाठी राजारामपुरीतून रुईकर कॉलनी येथील रुग्णालयात हलविले आहे. त्यांच्या हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Threats to be killed by mayor supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.