कपौंडची भिंत पाडल्याचा जाब विचारणाऱ्यालाच ठार मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 04:22 PM2020-07-07T16:22:48+5:302020-07-07T16:23:32+5:30
कोल्हापूर : प्लॉटच्या कंपौंडची भिंत पाडून त्यातून पायवाटेसाठी रस्ता केल्याबद्दल जाब विचारणाऱ्या जागामालकास शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देण्याचा ...
कोल्हापूर : प्लॉटच्या कंपौंडची भिंत पाडून त्यातून पायवाटेसाठी रस्ता केल्याबद्दल जाब विचारणाऱ्या जागामालकास शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार मोरेवाडी रोडवर कंजारभाट वसाहत, मोतीनगरमध्ये घडला. याबाबत मोतीनगरातील सातजणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विशाल माटुंगे, कविता माटुंगे, राजू माटुंगे, अमित माटुंगे, सुमित माटुंगे, कार्तिक माटुंगे, मनोज माटुंगे (सर्व रा. कंजारभाट वसाहत, मोतीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डॉ. अनुष्का कौस्तुभ वाईकर (रा. प्लॉट नं. ५०, अरुणोदय सोसायटी, राजेंद्रनगर) यांच्या मालकीचा शांतिनिकेतन रस्त्यावर रेव्हेन्यू कॉलनीत प्लॉट आहे. या प्लॉटच्या मागे माटुंगे हे राहण्यास आहेत. माटुंगे यांनी आपल्या घराकडे ये-जा करण्यासाठी वाईकर यांच्या प्लॉटच्या कंपौंडची भिंत पाडून पाऊलवाट केली आहे.
याबाबत डॉ. वाईकर व त्यांचे पती हे माटुंगे यांना जाब विचारण्यासाठी गेले, त्यावेळी माटुंगेसह सातजणांनी वाईकर दाम्पत्याला शिवीगाळ करत, आम्ही येथून जाणारच; तुम्हाला काय करायचे ते करा. तुम्ही येथे कसे घर बांधता ते बघतो, असे म्हणून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत डॉ. वाईकर यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात सातजणांविरुद्ध तक्रार दिली.