आरक्षण सोडतीवरून गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2017 01:01 AM2017-06-23T01:01:31+5:302017-06-23T01:01:31+5:30

शिरोली ग्रामपंचायत निवडणूक : नागरिक तहसीलदारांकडे तक्रार करणार

Threats on reservation draws | आरक्षण सोडतीवरून गदारोळ

आरक्षण सोडतीवरून गदारोळ

Next

शिरोली : शिरोलीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी काढण्यात येत असलेल्या आरक्षण सोडतीवरून गदारोळ झाला. त्यामुळे दोन वेळा आरक्षण सोडत काढण्याची नामुष्की अधिकाऱ्यांवर आली. वादातच सोडत काढून या अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. पण, ही सोडत मान्य नसून या विरोधात तहसीलदार वैशाली राजमाने यांच्याकडे नागरिक तक्रार करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.
येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण काढण्यासाठी आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अज्ञान व नागरिकांचा गदारोळ यामुळे सकाळी अकरा वाजता चिठ्ठीद्वारे काढण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द करण्यात आली. त्यानंतर दुपारी तीन वाजता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चिठ्ठीद्वारे आरक्षण न काढता मनाला येईल तसेच आरक्षण पुन्हा जाहीर केले. यामध्ये अनेक इच्छुकांच्या पदरी निराशा आली. त्यामुळे या आरक्षणावर निवडणूक विभागाकडे हरकती नोंदविणार असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विशेष सभा झाली. ग्रामपंचायतीचे सहा प्रभाग असून, ८ पुरुष व ९ महिला असे एकूण १७ सदस्य आहेत. गेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक हा दोन सदस्यांचा होता. यावेळी प्रभाग दोनमध्ये दोन सदस्य झाले. सरपंचपद खुले असल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आरक्षण प्रक्रियेतच ईर्ष्या पाहायला मिळाली. लोकसंख्येच्या निकषानुसार प्रभाग क्रमांक सहा मागासवर्गीय पुरुष व महिला आणि प्रभाग क्रमांक तीनमध्ये मागासवर्गीय महिला असे आरक्षण निश्चित झाले. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिलांचे आरक्षण चिठ्ठीतून काढले. त्यामध्ये प्रभाग दोन व तीनमधील सर्व जागा आरक्षित झाल्या, तर प्रभाग पाचमधील तिन्ही जागा सर्वसाधारण गटासाठी खुल्या झाल्या. त्यामुळे इच्छुकांनी प्रचंड गदारोळ करीत, आरक्षणावर हरकती घेतल्या. त्यामुळे आरक्षण सोडतीसाठी हातकणंगलेतून आलेले अव्वल कारकून भरत काळे यांना काहीच समजेना. त्यांनी तीनवेळा मोबाईलवरून तहसीलदार वैशाली राजमाने यांच्याशी संपर्क साधून, मार्गदर्शन घेतले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रथम आरक्षणाचा अभ्यास करावा व त्यानंतर प्रक्रिया राबवावी, अशी संतप्त प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली. या गदारोळातच काळे यांनी आरक्षण सोडतीसाठी पुन्हा दुपारी तीन वाजता बैठक घेण्याचे जाहीर केले.
दुपारी तीन वाजता पुन्हा आरक्षणाची प्रक्रिया झाली. यामध्ये गेल्या निवडणुकीतील आरक्षण, प्रभागनिहाय लोकसंख्येचा विचार करून, चक्रानुक्रमानुसार थेट आरक्षण जाहीर केले. यामध्ये कोणतीही सोडत पद्धत अवलंबली नाही. प्रभाग तीन व सहामधील मागासर्वीय आरक्षण कायम ठेवले. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) दोन पुरुष व तीन महिला अशा पाच जागा आरक्षित आहेत. यामध्ये २०१२च्या निवडणुकीत ओबीसी पुुरुष असलेल्या जागा महिलासाठी, तर महिलांच्या जागा पुरुषांसाठी आरक्षित केल्या. यामुळे प्रभाग क्रमांक दोनमध्ये ओबीसी महिलेच्या जागी पुरुष आरक्षण निश्चित झाले, त्यामुळे दुसरे आरक्षण सर्वसाधारण महिला असे आले. त्यामुळे इच्छुकांच्या अपेक्षावर पाणी फिरल्याने, काहींनी गदारोळ केला. त्यानंतर सर्वसाधारण गटातील चार महिला व सर्वसाधारण गटासाठी खुला असलेल्या पाच जागा प्रत्येक प्रभागात विभागून दिल्या. कोणतीही सोडत नाही, चिठ्ठ्या नाहीत; मात्र आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. आरक्षण सोडतीवर निवडणूक विभागावर हरकती घेणार असल्याचे काहींनी त्या ठिकाणीच जाहीर केले. यावेळी सरपंच जास्मिन गोलंदाज, तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य महेश चव्हाण, प्रकाश कौंदाडे, राजेश पाटील, सलीम महात, लियाकत गोलंदाज, ग्रामपंचायत सदस्य सागर कौंदाडे, राजू चौगुले, शिवाजी खवरे, शिवाजी समुद्रे, हरी पुजारी, शिवाजी कोरवी, विजय जाधव, राजकुमार पाटील, सतीश पाटील, आदी उपस्थित होते.
प्रभागनिहाय आरक्षण असे
प्रभाग १) सर्वसाधारण खुला, सर्वसाधारण महिला व ओबीसी महिला.
प्रभाग २) सर्वसाधारण महिला, ओबीसी पुरुष.
प्रभाग ३) सर्वसाधारण खुला, ओबीसी महिला, मागासवर्गीय महिला.
प्रभाग ४) सर्वसाधारण खुला, सर्वसाधारण महिला, ओबीसी पुरुष. प्रभाग ५) सर्वसाधारण खुला, सर्वसाधारण महिला, ओबीसी महिला. प्रभाग ६) सर्वसाधारण खुला, मागासवर्गीय पुरुष व महिला.
सरपंचपद तब्बल दहा वर्षांनंतर सर्वसाधारण गटासाठी खुले झाले आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी आहे. प्रभाग दोनमध्ये आरक्षित झाल्यामुळे इच्छुकांच्या पदरी निराशा आली. सोडतीत अनेकांचे पत्ते कट झाले. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
सोडतीसाठी बाजीराव भोसले यांच्या जागी भरत काळे हे अधिकारी आले होते. त्यांना सोडत प्रक्रियेची पूर्ण माहिती नसल्याचे अनेकवेळा दिसून आले. त्यामुळेच सभेत वारंवार गदारोळ झाला. यावेळी ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे, तलाठी नितीन कांबळे यांनी ग्रामस्थांना शांत केले.

Web Title: Threats on reservation draws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.