Kolhapur Crime: रात्रीत दुचाकी चोरायचे; चार-पाच हजारांत विकून मजा करायचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 18:48 IST2025-04-07T18:46:57+5:302025-04-07T18:48:04+5:30
तिघांना अटक; १४ दुचाकी जप्त, एलसीबीची कारवाई

Kolhapur Crime: रात्रीत दुचाकी चोरायचे; चार-पाच हजारांत विकून मजा करायचे
कोल्हापूर : रात्रीच्या अंधारात घराबाहेरील दुचाकींची चोरी करून त्याची अवघ्या चार-पाच हजारांत विक्री करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. अक्षय राजू शेलार (वय २४), विनायक बाळू गवळी (२२) आणि चंद्रदीप कुलदीप गाडेकर (२३, तिघे, रा. कागल) अशी अटकेतील दुचाकी चोरांची नावे आहेत.
पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील आठ लाखांच्या १४ दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई शनिवारी (दि. ५) दुपारी कागल डेपो येथे सापळा रचून केली. चोरलेल्या दुचाकी विकून मिळालेल्या पैशातून हे तिघे मौजमजा करीत होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चोरांचा शोध घेताना अंमलदार सागर चौगले यांना कागल येथील काही संशयितांची माहिती मिळाली होती. संशयित चोरटे कागल डेपो परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच शनिवारी दुपारी सापळा रचून त्यांना अटक केली. तिघांकडील तीन दुचाकींबद्दल विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीत त्यांच्याकडील दुचाकी चोरीतील असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यांंतून १४ दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली.
चोरलेल्या दुचाकी सीमाभागात अवघ्या चार ते पाच हजारांत त्यांनी विकल्या होत्या. पुढील तपासासाठी त्यांचा ताबा शिवाजीनगर पोलिसांकडे देण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह अंमलदार सागर चौगले, युवराज पाटील, राजू कांबळे, समीर कांबळे, अशोक पोवार, आदींच्या पथकाने कारवाई केली.
या भागातून चोरल्या दुचाकी
इचलकरंजी, कबनूर, कागल, गोकुळ शिरगाव, इस्पुर्ली, कुरुंदवाड, निपाणी आणि बसवेश्वर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या चार महिन्यांत त्यांनी चोऱ्या केल्या. चोरलेल्या दुचाकी ते चंद्रदीप गाडेकर याच्या घराजवळ असलेल्या ओढ्यात लपवत होते.
घरच्यांना धक्का
अटकेतील तिघेही प्रथमच पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. यातील विनायक गवळी हा कोल्हापुरातील एका नामांकित नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. तिघांनी १४ दुचाकींची चोरी केल्याची कबुली देताच त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला.