Kolhapur: २५ लाख लुटीचा छडा; तिघांना अटक, तपासणी अधिकारी असल्याचे सांगून लंपास केली होती रक्कम

By उद्धव गोडसे | Published: November 16, 2024 04:20 PM2024-11-16T16:20:54+5:302024-11-16T16:21:30+5:30

रोकडसह दोन कार जप्त, आणखी दोघांचा शोध सुरू

Three arrested in Kolhapur who robbed a businessman of Rs 25 lakh by claiming to be an inspection officer | Kolhapur: २५ लाख लुटीचा छडा; तिघांना अटक, तपासणी अधिकारी असल्याचे सांगून लंपास केली होती रक्कम

Kolhapur: २५ लाख लुटीचा छडा; तिघांना अटक, तपासणी अधिकारी असल्याचे सांगून लंपास केली होती रक्कम

कोल्हापूर : तावडे हॉटेल येथे तपासणी अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाची २५ लाख ५० हजारांची रक्कम लांबिवणा-या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छडा लावला. या गुन्ह्यातील तिघांना शुक्रवारी (दि. १५) दुपारी पुईखडी येथून अटक केली. त्यांच्याकडून लुटीतील २५ लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार असा सुमारे ५५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या टोळीतील तिघे संशयित सराईत गुन्हेगार आहेत.

या गुन्ह्यातील संजय महादेव किरणगे (४२, रा. विक्रमनगर, ता. करवीर), अभिषेक शशिकांत लगारे (२४) आणि विजय तुकाराम खांडेकर (२८, दोघे रा. उचगाव, ता. करवीर) यांना पोलिसांनी अटक केली. स्वप्नील उर्फ लाला तानाजी जाधव (रा. पाचगाव) आणि हर्षद खरात (रा. राजारामपुरी) या दोघांचा अद्याप शोध सुरू आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेत पाळणे लावणारे व्यावसायिक सुभाष लक्ष्मण हारणे (वय ५०, रा. बागल चौक, कोल्हापूर) हे १२ नोव्हेंबरला पहाटे व्यवसायाची २५ लाख ५० हजारांची रक्कम घेऊन कर्नाटकातून तावडे हॉटेल येथे आले. खासगी ट्रॅव्हल्समधून उतरताच सर्व्हिस रोडला त्यांना पाच जणांच्या टोळीने अडवले. तपासणी अधिकारी असल्याचे सांगत त्यांची झडती घेतली.

जवळ मोठी रक्कम असल्याचे दिसताच हारणे यांना कारमध्ये बसवून ते सरनोबतवाडीच्या दिशेने गेले. रक्कम आणि मोबाइल काढून घेऊन त्यांनी पोबारा केला होता. फिर्याद दाखल होताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ६ पथकांनी संशयितांचा शोध सुरू केला होता. चार दिवसांत तिघांना अटक करून पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला.

कार बदलून टोळी गोव्याला पळाली

मोठी रक्कम हाताला लागताच बनावट तपासणी अधिका-यांची टोळी चित्रनगरीमार्गे पाचगावला पोहोचली. लुटीसाठी वापरलेली निसान कार ठेवून, दुसरी हॅरिअर कार घेऊन ते निपाणीच्या दिशेने गेले. कोगनोळी टोल नाक्यावर तपासणी नाक्यात अडकू नये आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसू नये यासाठी ते कोगनोळी गावातून पुढे कर्नाटकमध्ये गेले. त्यानंतर ते गोव्याला पोहोचले.

असा झाला उलगडा

अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला. संशयित कारचे सीसीटीव्ही फुटेज मिळताच त्यावरून कारच्या मालकाचा शोध घेतला. कारच्या मालकाकडे चौकशी केल्यानंतर टोळीतील संशयितांची नावे समोर आली. त्यांचे मोबाइल लोकेशन गोव्यातील मिळताच पोलिसांचे एक पथक गोव्याला गेले. गोव्यातून कोल्हापूरला परत येणा-या टोळीतील तिघांना पोलिसांनी पुईखडी येथे पकडले.

Web Title: Three arrested in Kolhapur who robbed a businessman of Rs 25 lakh by claiming to be an inspection officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.