तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांनी कोल्हापूरामध्ये मोर्चा काढून दिली धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 06:28 PM2018-12-20T18:28:48+5:302018-12-20T18:30:27+5:30
ग्रामीण परवानाधारक रिक्षा चालकांना शहर वगळून जिल्हा परवाना द्यावा, यासह अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर सात दिवसांत कारवाई करावी. अन्यथा आम्ही ‘सविनय कायदेभंग’ अर्थात मध्यवर्ती बसस्थानकापासून पाच प्रवाशांना घेऊन प्रवासी वाहतूक सुरू करू, असा इशारा कोल्हापूर शहर समस्त तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांनी गुरुवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना मोर्चाद्वारे दिला.
कोल्हापूर : ग्रामीण परवानाधारक रिक्षा चालकांना शहर वगळून जिल्हा परवाना द्यावा, यासह अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर सात दिवसांत कारवाई करावी. अन्यथा आम्ही ‘सविनय कायदेभंग’ अर्थात मध्यवर्ती बसस्थानकापासून पाच प्रवाशांना घेऊन प्रवासी वाहतूक सुरू करू, असा इशारा कोल्हापूर शहर समस्त तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांनी गुरुवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना मोर्चाद्वारे दिला.
गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ कोल्हापूर शहरामध्ये तीन आसनी रिक्षा व्यावसायिक हे सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा एक प्रमुख घटक म्हणून प्रवासी वर्गाला सेवा देत आहेत. त्यात शासनाचे सर्व नियम व कर भरून आणि वेळोवेळी भरमसाट वाढविलेला विमा ही ते भरत आहेत. तरीही प्रामाणिक रिक्षाचालकांचा व्यवसाय कोलमडला आहे; त्यामुळे अनेक रिक्षाचालक, मालक कर्जबाजारी झाले आहेत.
त्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहा आसनी व टाटा मॅजिक सारख्या गाड्यांमध्ये परवान्यापेक्षा जास्त प्रवासी बसवले जातात. त्याचा फटका प्रामाणिक रिक्षाचालकांना बसत आहे. याशिवाय प्रवाशांच्या जीवितालाही धोका पोहोचत आहे. यावर कारवाई करा म्हणून वारंवार निवेदन देऊनही ना प्रादेशिक परिवहन व पोलीस खाते दखल घेत नाही; त्यामुळे येत्या सात दिवसांत अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करावी.
तीन आसनी रिक्षामध्ये ४ प्रवासी वाहतुकीची रितसर परवानगी द्यावी. विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने बैठक घेऊन विमा हफ्ता कमी करावा, असे न झाल्यास प्रामाणिक तीन आसनी रिक्षाचालकही ‘सविनय कायदेभंग’ अर्थात मध्यवर्ती बसस्थानकापासून पाच प्रवाशांना घेऊन आपला व्यवसाय करतील, असा इशारा आंदोलकांतर्फे देण्यात आला.
या मोर्चात कॉमन मॅन तीन आसनी रिक्षा संघटना, भारतीय जनता पार्टी तीन आसनी रिक्षा संघटना, करवीर आॅटो रिक्षा संघटना, महाराष्ट्र रिक्षाचालक सेना, आदर्श रिक्षा युनियन, शेअर-ए-रिक्षा संघटना, हिंदुस्थान आॅटो रिक्षा संघटना, स्वाभिमान रिक्षा संघटना, विद्यार्थी वाहतूक संघटना, आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व अॅड. बाबा इंदुलकर यांनी केले. यावेळी सुभाष शेटे, ईश्वर चणी, विजय गायकवाड, जाफर शेख, सरफरुद्दीन शेख, रमेश पोवार, अविनाश दिंडे, श्रीकांत पाटील, संजय भोरे, आदी उपस्थित होते.