कोल्हापूरात गांजा ओढताना दोन डॉक्टसह तिघांना अटक, ५० हजारांचा माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 03:31 PM2018-08-20T15:31:36+5:302018-08-20T15:34:21+5:30
शेंडापार्क येथे उघड्या माळावर गांजा व चरस सेवनप्रकरणी दोन डॉक्टरांसह तिघांना राजारामपुरी पोलिसांनी रविवारी (दि. १९) रात्री उशिरा अटक केली .
कोल्हापूर : शेंडापार्क येथे उघड्या माळावर गांजा व चरस सेवनप्रकरणी दोन डॉक्टरांसह तिघांना राजारामपुरी पोलिसांनी रविवारी (दि. १९) रात्री उशिरा अटक केली .
याप्रकरणी संशयित डॉ.भुषण चंद्रकांत मिठारी (वय ३१, रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर), डॉ. स्वप्निल सुनील मंडलिक ( ३०, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर)व युवराज उर्फ अभि मोहन महाडिक ( ३५, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५० ग्रॅमचा गांजा, ७० ग्रॅमचे चरस व कार असा सुमारे ५० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी सांगितले की, शेंडा पार्क परिसरात पोलिस रविवारी गस्त घालत होती. पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानूसार शेंडा पार्क येथील माळावर गेले असता संशयित डॉ. भुषण मिठारी, डॉ. स्वप्निल मंडलिक व अभि महाडिक हे तिघेजण अंमली पदार्थ सेवन करत बसल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी या तिघांना पकडले. त्यांच्या ताब्यातील गांजा, चरस जप्त केले. या तिघांना घेऊन पोलिस ठाण्यात आणले. संशयित अभि महाडिक हा या दोघांना हे अंमली पदार्थ पुरवित असल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे.
अभि महाडिक हा केबल व्यावसायिक आहे तर डॉ. भुषण मिठारी याने नुकतीच बी.एच.एम.एस.ची पदवी घेतली आहे. डॉ.स्वप्निल मंडलिकचा मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दवाखाना आहे.
बाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर केदार यांनी दिली. सोमवारी दूपारी या तिघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आण्णाप्पा कांबळे, कॉंन्स्टेबल रणजित कांबळे, राहूल मोहिते, संजय जाधव आदींचा सहभाग होता.
दुसरी मोठी कारवाई...
दोन महिन्यापुर्वी टाकाळा परिसरातील जलतरण तलावशेजारी असलेल्या बागेमध्ये एका विद्यार्थिनींसह तीन महाविद्यालयीन तरुण अशा चौघेजणांना पोलिसांनी गांजा प्रकरणी अटक केली होती. त्यांच्याकडून गांजा राजारामपुरी पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर शेंडा पार्क येथे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली.