कोल्हापुरात रस्त्यावर तीन गव्यांचे दर्शन, शोधमोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 10:31 AM2020-12-26T10:31:13+5:302020-12-26T10:32:40+5:30
wildlife kolhapur forest-कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर गवत मंडई येथून शिंगणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री तीन गवे आल्यामुळे वन विभाग, पोलीस व अग्निशमन दल यांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत हे गवे गेले कोठे याची शोधमोहीम सुरू होती.
कोल्हापूर : शहरातील उत्तरेश्वर गवत मंडई येथून शिंगणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री तीन गवे आल्यामुळे वन विभाग, पोलीस व अग्निशमन दल यांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत हे गवे गेले कोठे याची शोधमोहीम सुरू होती.
शुक्रवारी रात्री शिंगणापूर रस्त्यावर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तीन गवे रस्त्यावरून जात असलेले काही लोकांनी पाहिले. त्याचा एक व्हिडीओसुद्धा त्यांनी व्हायरल केला. शहरालगत नागरी वस्तीत अचानक गवे आल्याची वार्ता परिसरात पसरली. काहीजणांनी फोनवरून ही माहिती वन विभाग, अग्निशमन दल व पोलिसांना कळविली. तत्काळ सर्व यंत्रणा घटनास्थळावर पोहोचली.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ शिंगणापूरकडे जाणारा रस्ता बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी बंद केला. त्यांनी गस्त घालण्यास सुरुवात केली. परंतु रात्रीचा अंधार, उसाची शेती, पाणंद यामुळे गव्यांचा माग लागला नाही. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपली शोधमोहीम सुरू ठेवली. रात्री उशिरापर्यंत गव्यांचे दर्शन झाले नाही.