‘क्राईम अँड पनिशमेंट’ला राज्य नाट्य स्पर्धेत तीन पारितोषिके
By Admin | Published: March 17, 2015 12:02 AM2015-03-17T00:02:46+5:302015-03-17T00:06:27+5:30
पनवेलमधील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात १६ फेब्रुवारी ते १३ मार्चदरम्यान ही अंतिम फेरी घेण्यात आली.
कोल्हापूर : ५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोल्हापुरातील ‘क्राईम अँड पनिशमेंट’ नाटकातील कलाकार आदित्य खेबुडकर व रसिया पडळकर यांना अभिनयासाठी रौप्यपदक मिळाले. रंगभूषेसाठी विजय ढेरे यांना तृतीय क्रमांक देण्यात आला. पनवेलमधील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात १६ फेब्रुवारी ते १३ मार्चदरम्यान ही अंतिम फेरी घेण्यात आली. यात नशिकमधील लोकहितवादी मंडळाच्या न ही वैरेन वैराणी, नागपूरच्या अंकुर मानव समाज उत्थान केंद्राच्या विठाबाई व पुण्याच्या ध्यास संस्थेच्या परवाना या तीन नाटकांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
कोल्हापूर केंद्रात प्रथम आलेल्या ‘क्राईम अँड पनिशमेंट’ नाटकाला या अंतिम फेरीत अभिनयासाठी दोन रौप्यपदके व रंगभूषेसाठी तृतीय क्रमांक अशी तीन पारितोषिके मिळाली. सुशिक्षित बेरोजगार युवकाच्या हातून घडलेला गुन्हा आणि विवेकी पातळीवर त्याच्याकडून केले जाणारे समर्थन आणि अखेरीस युवकाला झालेला पश्चात्ताप असे या नाटकाचे कथानक होते. पवन खेबुडकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले. (प्रतिनिधी)