बचत गटांना पावणेतीन कोटींचा पतपुरवठा-‘एसबीआय चावडी’तून एक दिवसात मंजूरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:14 PM2019-11-21T12:14:35+5:302019-11-21T12:15:53+5:30
यात जिल्ह्यातील १४३ महिला बचत गटांना दोन कोटी ७० लाख रुपये, तर कृषी संबंधित एक कोटी ५० लाख इतका पतपुरवठाही मंजूर केला. यासोबतच चारचाकीची १३ प्रकरणे, तर जीवनज्योती प्रमाणपत्रे २५० हून अधिक करण्यात आली; तर ४० गृह प्रकरणे, १०० हून अधिक बचत खाती व २५ हून अधिक एसबीआय कार्डे वितरित करण्यात आली.
कोल्हापूर : भारतीय स्टेट बँकेच्या विविध कर्जयोजना समाजातील सर्वच स्तरांतील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दसरा चौक येथे दोनदिवसीय ‘एस.बी.आय. चावडी’ मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील १४३ महिला बचत गटांना एकूण दोन कोटी ७० लाख रुपयांची कर्जे मंजूर करण्यात आली. यासह कृषी, गृह, वाहन कर्ज, आदींनाही त्वरित मंजुरी देण्यात आली.
सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी स्टेट बँकेने ‘एस.बी.आय. चावडी’ हा विशेष ग्राहकाभिमुख उपक्रम आयोजित केला होता. यात योनो,जीवन प्रमाणपत्र, वैयक्तिक कर्ज, ठेव, लघु व मध्यम व्यावसायिक कर्जे, एम. एस. एल. एम., कृषी विभाग, ग्राहक मूल्य संवर्धन, कार लोन हब, नेत्रतपासणी, आरोग्य तपासणी, कृषी सिंचन, ट्रॅक्टर विभाग. जैविक व रासायनिक खते, कृषी विभाग, एसबीआय, बांधकाम व्यावसायिक, गृह कर्ज विभाग, बचत खाते, स्वयंसिद्धा अशा ३३ स्टॉल्सची उभारणी करण्यात आली होती. यात दोन दिवसांत एकूण १५ हजारांहून अधिक लोकांनी भेट दिली. यात महिला बचतगट, सर्वसामान्य ग्राहक, आदींना किमान सहा कोटी रुपयांपर्यंतचा पतपुरवठा मंजूर केला. त्याबाबतचे पत्रेही संबंधितांना देण्यात आली. दरम्यान, स्टेट बँकेचे उपमुख्य महाव्यवस्थापक अबीद उल्ला रहिमान यांनी या मेळाव्यास भेट दिली. स्टेट बँकेचे सहायक महाप्रबंधक प्रदीप देव यांनी स्वागत केले.