मिरजेत तीन कोटींचे घबाड

By admin | Published: March 13, 2016 01:02 AM2016-03-13T01:02:57+5:302016-03-13T01:02:57+5:30

पोलिसांची कारवाई : जाखलेच्या एकास अटक; मेहुणीच्या घरावर छापा; चौकशी सुरू

Three crore hoaxes in mirage | मिरजेत तीन कोटींचे घबाड

मिरजेत तीन कोटींचे घबाड

Next

सांगली/मिरज : मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये एका भाडेकरूच्या घरात छापा टाकून पोलिसांनी ३ कोटी ७ लाख ६३ हजार ५०० रुपये जप्त केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शनिवारी दुपारी ही कारवाई केली. याप्रकरणी मैनुद्दीन ऊर्फ राजा अबुबक्कर मुल्ला (वय ४०, जाखले ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यास अटक केली आहे. त्याने ही रक्कम बेथेलहेमनगरमधील तिसऱ्या गल्लीत राहणारी त्याची मेहुणी रेखा मधुकर भोरे हिच्या घरात ठेवली होती. तिलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुल्लाने ही रक्कम कोठून व कशासाठी आणली होती, याची चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी सांगितले.
मैनुद्दीन मुल्ला हा गेल्या दोन दिवसांपासून सांगलीत विनाक्रमांकाच्या मोटारसायकलवरून संशयास्पदरित्या फिरत होता. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शनिवारी दुपारी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले. बुलेटची चौकशी केली. तथापि त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्याची अंगझडती घेतल्यानंतर सव्वालाखाची रोकड आढळून आली. यामध्ये हजार व पाचशेच्या नोटा होत्या. एवढी रक्कम कोठून व कशासाठी आणली, यासंदर्भात चौकशी केली. पण तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये असलेल्या रेखा भोरे या मेहुणीकडे निघालो असल्याचे त्याने सांगितले. पथकाने त्याला ताब्यात घेऊन बेथेलहेमनगर गाठले. रेखा गल्ली क्रमांक तीनमध्ये राहते. तिच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी घरात चार सुटकेस आढळून आल्या. सर्व सुटकेस नोटांनी भरलेल्या आढळून आल्या. यात हजार व पाचशेच्या नोटा होत्या.
नोटा खऱ्या आहेत का नाही, याची खात्री करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. बँक अधिकाऱ्यांचे पथकही नोटा मोजण्याचे तसेच त्या तपासण्याचे यंत्र घेऊन घटनास्थळी दाखल झाले. दुपारी दोन वाजता नोटांची मोजदाद सुरू झाली होती. रात्री उशिरापर्यंत ती सुरूच होती. सहा वाजेपर्यंत रक्कम मोजून झाली होती. जप्त केलेल्या नोटा हजार व पाचशेच्या असून, त्या खऱ्या आहेत.
रेखा भोरे अत्यंत साध्या भाड्याच्या घरात राहते. तिच्या घरात मुल्लाने रक्कम ठेवण्याचे काय कारण? याचा शोध घेतला जात आहे. मिरजेत कोट्यवधीच्या नोटा सापडल्याचे वृत्त पसरताच बेथेलहेमनगरमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस यंत्रणाही या घटनेने चक्रावून गेली आहे.
रक्कम चोरीतील?
संशयित मुल्ला हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतो. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. यामध्ये त्याने ही रक्कम हवालामधील असल्याचे सांगितले आहे. पण पोलिसांचा त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही. ही रक्कम चोरीतील व त्याच्या वाट्याला आलेली असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू ठेवण्यात आला आहे.
रक्कम आली कोठून?
मुल्लाकडे ही रक्कम हवालामधील किंवा बनावट नोटांची देवाण-घेवाण करण्यासाठी आली असण्याची शक्यता आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत कोणतीही ठोस माहिती उजेडात आली नव्हती. मुल्लास उद्या (रविवारी) न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
एका सहकारी बँकेच्या स्लिप
रेखाची बहीण काही वर्षांपूर्वी वारणावती येथे नोकरीस होती. तिथेच मुल्लाची तिच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी विवाह केला. गेल्या तीन वर्षांपासून तो पत्नीसोबत रेखाच्या घरी रहात आहे. जप्त करण्यात आलेल्या काही नोटांची बंडले पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये होती. या बॉक्सला मुल्लाने चांगले पॅकिंग करून यात कपडे असल्याचे त्याने घरच्यांना सांगितले होते. पण काही दिवसानंतर त्याने यात रक्कम आहे, असे सांगितले. अनेक नोटांच्या बंडलवर वारणा बँकेचे नाव असलेल्या स्लिपा आहेत.
संशयिताचा प्रेमविवाह
संशयित मैनुद्दीन मुल्ला याने प्रेमविवाह केला आहे. रेखा भोरे त्याची मेहुणी आहे. तीही बेथेलहेमनगरमध्ये भाड्याने खोली घेऊन रहात होती. तिच्या घरी तो नेहमी येत असे. कोट्यवधी रुपयांची ही रक्कम त्याने अनेक दिवसांपूर्वी ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बाब भोरे कुटुंबासही माहीत होती.मुल्लाने अलीकडे तीन महागड्या मोटारसायकली खरेदी केल्या आहेत. यातील एका बुलेटवरून तो सांगलीत फिरत होता. अलीकडे त्याचा सांगलीत वावर वाढला होता. त्याच्याविरुद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे निरीक्षक घनवट यांनी सांगितले.
गावाशी संपर्क नाही
मैनुद्दिन याचे जाखले (ता. पन्हाळा) हे मूळ गाव आहे. गावी आई व भाऊ असतात. गेल्या अनेक वर्षांपासून मैनुद्दिनचा गावाशी संपर्क नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्याच्याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. कधीतरी मैनुद्दिन गावी येत असे.
पथकाला बक्षीस
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे, हवालदार शंकर पाटील, दीपक पाटील, अझर पिरजादे, बंडू नागणे, संदीप मोरे, रवी पाटील, राजू कोळी, कुलदीप कांबळे, दीपा कांबळे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईचे पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी कौतुक करून बक्षीस जाहीर केले.
जप्त केलेली रक्कम व संशयित मुल्लाची चौकशी सुरू आहे. त्याने ही रक्कम कोठून व कशासाठी आणली होती? मेहुणीच्या घरात रक्कम का ठेवली होती? या सर्व बाबींचा उद्यापर्यंत छडा लावला जाईल. आयकर विभागाला याची माहिती दिली आहे.
- विश्वनाथ घनवट, पोलिस निरीक्षक )

Web Title: Three crore hoaxes in mirage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.