औषधे ठेवण्यासाठी आलेेला तीन कोटींचा कुलर धूळ खात; औषध भांडारगृहातील प्रकार : आरोग्य उपसंचालक कार्यालयाचा गलथानपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:19 AM2021-05-28T04:19:38+5:302021-05-28T04:19:38+5:30
कोल्हापूर : आरोग्य उपसंचालकांच्या अखत्यारीत येणाऱ्या औषध भांडारगृहासाठी शासनाकडून औषधे ठेवण्यासाठी आलेला तीन कोटी रुपयांचा वाॅक-इन-कुलर जोडणी केली नसल्याने ...
कोल्हापूर : आरोग्य उपसंचालकांच्या अखत्यारीत येणाऱ्या औषध भांडारगृहासाठी शासनाकडून औषधे ठेवण्यासाठी आलेला तीन कोटी रुपयांचा वाॅक-इन-कुलर जोडणी केली नसल्याने तब्बल तीन महिने व्हरांड्यातच धूळ खात पडून आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून शासन प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य उपकरणे खरेदी करण्यास शासन प्राधान्य देत आहे आणि आरोग्य उपसंचालक कार्यालयात मात्र आलेले यंत्रही त्यांना जोडून घेता आलेले नाही, असे संतापजनक चित्र दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आरोग्य उपसंचालक कार्यालयासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा औषध व लस ठेवण्यासाठी लागणारा वाॅक-इन-कुलर शासनाकडून तीन महिन्यांपूर्वी आला आहे. तो बसविण्यासाठी कारागीर व तंत्रज्ञ मिळत नसल्याने तो भांडारगृहाच्या बाहेर पडून आहे. लाईन बझार येथील सेवा रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या औषध भांडारगृह हे चार वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून बांधले आहे. मात्र त्याचा वापर पूर्ण क्षमतेनुसार होत नसून त्यासाठी लागणारी सर्व यंत्रसामग्रीही आली आहे. परंतु ही यंत्रसामग्री सुरू करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञ व कारागीर लाॅकडाऊनमुळे मिळत नसल्याचे आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. लॉकडाऊन असला तरी बहुतांश व्यवहार सुरू आहेत. शिवाय हे तरी समाजाच्या आरोग्याशी संबंधित काम आहे. त्यामुळे युद्धपातळीवर यंत्रणा राबवून ही यंत्रसामग्री जोडून घ्यायला हवी होती. परंतु तसे घडलेले नाही. ज्या कंपनीने ही यंत्रसामग्री पुरवली आहे, त्यांच्यापर्यंत हा विषय नेऊन त्यांचे तंत्रज्ञ बोलावूनही ती जोडून घेता आली असती; परंतु यातील काहीच झालेले नाही. आरोग्य उपसंचालक कार्यालय हाताची घडी घालून कोणीतरी आभाळातून तंत्रज्ञ येईल व मग ही यंत्रसामग्री जोडून देईल अशी वाट पाहत आहे की काय, अशी विचारणा होत आहे. (पूर्वाध)
----‐-------
चार जिल्ह्यांचा औषधसाठा
कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील औषधसाठा या भांडारगृहात केला जातो. या चार जिल्ह्यांसाठी हे दुसरे वाॅक‐इन-कुलर मशीन आहे. या अगोदर असेच एक मशीन सीपीआर रुग्णालयात बसविण्यात आले आहे.
----------------
फोटो : २७०५२०२१-कोल-बंद कूलर
कोल्हापुरातील आरोग्य उपसंचालक औषध भांडारगृहाच्या दारात वापराविना पडून असलेले वाॅक-इन-कुलर यंत्र असे जुन्या कापडाने झाकून ठेवण्यात आले आहे. (छाया-दीपक जाधव)