कंटेनर-स्कूलबस अपघातात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:16 AM2018-06-27T06:16:59+5:302018-06-27T06:17:21+5:30

भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरचा ताबा सुटल्याने तो दुभाजक तोडून स्कूल बसवर आदळून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले; तर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या २२ विद्यार्थ्यांसह २४ जण जखमी झाले

Three die in container-school bus crash | कंटेनर-स्कूलबस अपघातात तिघांचा मृत्यू

कंटेनर-स्कूलबस अपघातात तिघांचा मृत्यू

Next

कोल्हापूर : भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरचा ताबा सुटल्याने तो दुभाजक तोडून स्कूल बसवर आदळून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले; तर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या २२ विद्यार्थ्यांसह २४ जण जखमी झाले. कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर चोकाक येथे मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.
मृतांमध्ये बसचालक जयसिंग गणपती चौगुले (वय ४८, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर), कंटेनरचालक सुरेश गणपती खोत (४४, रा. लोणारवाडी, जि. सांगली ) व वाहक सचिन खिलारी (३०, रा. शेणवडी, ता. आटपाडी जि. सांगली) यांचा समावेश आहे.
कंटेनर सांगलीहून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. याचवेळी अतिग्रे येथील संजय घोडावत स्कूलची बस मुलांना घेऊन अतिग्रेच्या दिशेने निघाली होती. चोकाक येथे अचानक कंटेनर रस्ता दुभाजक फोडून विरुद्ध दिशेला घुसला. त्यामुळे स्कूलबस आणि कंटेनरची जोरदार धडक झाली. स्कूलबसमधील २२ विद्यार्थी व २ सहाय्यक जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्वत:चा जीव धोक्यात घालून बसचालकाने विद्यार्थ्यांना वाचविले
कंटेनरची धडक बसते असे वाटताच बसचालक जयसिंग चौगुले यांनी प्रसंगावधान राखून, स्वत:चा जीव धोक्यात घालत बस डाव्या बाजूच्या शेतवडीत घुुसवली. तरीही कटेंनर चालकाच्या बाजूने थोडासा घासलाच. यात चौगुले मृत्युमुखी पडले. हीच धडक समोरासमोर झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता. चौगुले यांनी स्वत:चे प्राण गमावले मात्र विद्यार्थ्यांना वाचविले. चौगुले यांच्यामागे पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना अडीच लाख रुपये व मुलास भविष्यात संस्थेत नोकरी देण्याचे आश्वासन घोडावत समुहाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी दिले आहे.
 

Web Title: Three die in container-school bus crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.