कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील तिघा शेतकऱ्यांना मिळाली परदेश वारीची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 05:05 PM2024-02-21T17:05:54+5:302024-02-21T17:06:42+5:30
विदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान पाहणार
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांना विदेशातील आधुनिक तंत्रज्ञान पाहण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावयाचे होते. कोल्हापूर जिल्ह्यातील १७ शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज केले होते; परंतु जिल्ह्यासाठी केवळ तीन शेतकऱ्यांचे उद्दिष्ट असल्याने पात्र प्रस्तावांपैकी ३ जणांना ही संधी मिळणार आहे.
याबाबतची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून जगदीश साताप्पा गोंगाने, निगवे खालसा, ता. करवीर, उत्तम इरगोंडा पाटील, कबनूर, ता. हातकणंगले, सुधीर मोतीराम लांडे, माणगाव ता. चंदगड या तिघांची या प्रक्रियेतून निवड करण्यात आली आहे.
कृषि कार्यालयातर्फे अभ्यास दौरा
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागातर्फे या दौऱ्याचे आयोजन करण्यात येते. राज्यातील शेतकऱ्यांनी परदेशात जावे. तेथील आधुनिक शेतीची माहिती घ्यावी आणि आपल्या शेतामध्ये त्याचा अवलंब करावा आणि इतर शेतकऱ्यांना आपल्यापासून प्रेरणा द्यावी असा यामागचा हेतू आहे.
२५ शेतकऱ्यांचे अर्ज
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार एकूण १७ शेतकऱ्यांचे प्रस्ताव कृषी कार्यालयाकडे प्राप्त झाले होते. त्यातील विविध निकषांमध्ये न बसणारे पाच प्रस्ताव अमान्य करण्यात आले. उर्वरित १२ प्रस्तावांपैकी तिघांची सोडतीद्वारे निवड करण्यात आली.
५० टक्के खर्च शेतकऱ्यांचा
शेतकऱ्यांच्या या विदेश दौऱ्यासाठी जो एकूण खर्च येणार आहे त्यातील ५० टक्के खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. उर्वरित ५० टक्के खर्च शासन करणार आहे.
अनुदान किती ?
यासाठी नेमके किती अनुदान उपलब्ध होणार आहे हे अजूनही निश्चित ठरलेले नाही.
कोणत्या देशात जाणार ?
शेतकऱ्यांना नेमके कोणत्या परदेशांमध्ये नेण्यात येणार आहे हे देखील अजून निश्चित झालेले नाही.
कधी जाणार ?
शेतकऱ्यांना कधी परदेशामध्ये न्यायचे हे राज्य पातळीवर नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले.
शासनाच्या वतीने आयोजित या विदेश दौऱ्यासाठीची निवड प्रक्रिया १३ फेब्रुवारी २४ रोजी पार पडली आहे. याची पुढची प्रक्रिया शासनाच्या पुढील आदेशानुसार केली जाणार आहे. - अरुण भिंगारदेवे, जिल्हा अधीक्षक, कृषि अधिकारी, कोल्हापूर