गुंड निसार नगारजीसह तिघांची धिंड
By admin | Published: June 7, 2015 11:37 PM2015-06-07T23:37:19+5:302015-06-08T00:50:02+5:30
खंडणी प्रकरण : खणभाग, पंचशीलनगरमध्ये फिरविले; घरावर छापे
सांगली : राष्ट्रवादीचे जिल्हा खजिनदार मुश्ताकअली रंगरेज यांच्याकडे पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला गुंड निसार व त्याचे साथीदार आयुब पटेल व आयुब बारगीर या तिघांची रविवारी दुपारी खणभाग, बदाम चौक, शंभरफुटी व पंचशीलनगर परिसरात फिरवून धिंड काढली. तिघांच्या घरावर छापे टाकून पुन्हा झडती घेण्यात आली, मात्र हाती काहीच लागले नाहीत.
पंधरवड्यापूर्वी नगारजी, पटेल व बारगीर यांनी रंगरेज यांच्या घरात जाऊन कऱ्हाड (जि. सातारा) येथील गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या याच्या मध्यस्थीने पाच लाखांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास कुटुंबास ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर रंगरेज यांनी संजयनगर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. यातील नगारजीला गेल्या आठवड्यात कर्नाटकातून अटक करण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी पटेल व बारगीर यांना अटक केली आहे. सध्या तिघेही पोलीस कोठडीत आहेत. सल्या चेप्या याने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. १५ जूनला त्याच्या जामिनावर अंतिम निर्णय आहे. तोपर्यंत न्यायालयाने त्याला तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे पोलिसांना त्याला अटक करता येत नाही.
नगारजी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याची गेल्या आठवड्यात धिंड काढण्यात आली होती. त्यानंतर रविवारी दुपारी पुन्हा त्याच्यासह बारगीर व पटेल यांची धिंड काढण्यात आली. खणभाग, नळभाग, मटण मार्केट व शंभरफुटी रस्ता, पंचशीलनगर येथे तिघांचे वास्तव्य असते. तसेच त्यांची या भागात दहशतही असल्याने या भागातून त्यांची धिंड काढली. प्रत्येक चौकात नेऊन त्यांचा खरपूस समाचार घेतला. ही कारवाई पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
तक्रारी कराव्यात
धिंड काढण्यासाठी फिरवत असताना पोलिसांनी नगारजीसह तिघांनी काय गुन्हा केला आहे, याची माहिती नागरिकांना सांगितली. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, पुन्हा त्यांनी असा गुन्हा करु नये, यासाठी ही कारवाई सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ते खंडणी अथवा अन्य कोणत्याही कारणासाठी धमकावत असतील, तर पोलिसांत तक्रार करावी, असे आवाहनही पोलिसांनी केले.