‘चित्री’च्या वसाहतीसाठी तीन स्वतंत्र ग्रामपंचायती
By admin | Published: May 15, 2015 09:34 PM2015-05-15T21:34:43+5:302015-05-15T23:37:18+5:30
वसाहतींमधील प्रकल्पग्रस्तांची राजकीय गुलामगिरी संपुष्ठात येण्याचा मार्ग खुला झाला आहे.
ज्योतीप्रसाद सावंत -आजरा -चित्री प्रकल्पातंर्गत येणाऱ्या रायवाडा आवंढी व चित्रानगर य वसाहतींचे स्वतंत्र ग्रामपंचायतींमध्ये रूपांतर करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, १५ आॅगस्ट २०१५ रोजी स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झेंडा फडकवण्याबरोबरच वसाहतींमधील प्रकल्पग्रस्तांची राजकीय गुलामगिरी संपुष्ठात येण्याचा मार्ग खुला झाला आहे.
अपुऱ्या लोकसंख्येच्या निकषाचे कारण पुढे करून प्रकल्पग्रस्तांच्या या वसाहती लगतच्या ग्रामपंचायतींना जोडण्यात आल्या होत्या. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर व कॉ. संपत देसाई यांनी याला प्रचंड विरोध करीत राज्यभरातील प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींकरिता एक हजार लोकसंख्येचा निकष बाजूला ठेवून ३५० लोकसंख्येकरिता प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींकरिता स्वतंत्र ग्रामपंचायती करण्याच्या मागणीवर ठाम राहत गुढी आंदोलन उभारले होते.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींना दर्जा देण्याबाबत निर्णय झाला; पण पुढील प्रक्रिया थांबली होती. गेले महिनाभर पुन्हा ‘श्रमुद’ने कार्यवाहीसाठी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मंत्री, आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या पातळीवर बैठका सुरू होत्या. प्रकल्पग्रस्तांची गावठाणे मंजूर झाली; परंतु महसूल गाव रूपांतरण प्रक्रिया थांबली होती. अखेर या बैठकांमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात आला. यामध्ये चित्री प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावठाण्यांना प्राधान्य देण्याचेही ठरले आहे. यामुळे आवंढी व चित्रानगर गावठाणांचे स्वतंत्र ग्रामपंचायतीमध्ये रूपांतरण करण्यास काहीच अडचण राहिलेली नाही. शिवाय रायवाड्याचीही स्वतंत्र ग्रामपंचायत होणार आहे.
गुलामगिरी संपुष्टात : देसाई
प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींना स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा नसल्याने या वसाहतींवर एखादा राजकीय गट अथवा पक्ष आपले वर्चस्व ठेवू पाहत असे; परंतु या वसाहतींना स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांची राजकीय गुलामगिरी संपुष्टात येणार असल्याचे कॉ. संपत देसाई यांनी स्पष्ट केले.