थोडगे मारहाणप्रकरणी तिघा पोलिसांना ‘झटका’
By admin | Published: November 2, 2014 11:49 PM2014-11-02T23:49:25+5:302014-11-02T23:54:14+5:30
दोन दिवसांत कारवाई : पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी मागविला अहवाल
एकनाथ पाटील-कोल्हापूर -राजकीय हस्तक्षेपामुळे तब्बल पाच महिने लांबणीवर पडलेल्या गगनबावडा पंचायत समितीचे माजी सभापती बंकट थोडगे मारहाण प्रकरणात करवीरच्या तिघा पोलिसांना झटका बसणार आहे. तपास अधिकारी किसन गवळी यांनी केलेल्या तपासामध्ये हे पोलीस दोषी आढळले आहेत. हा अहवाल दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी गवळी यांना दिले आहेत.
अहवाल प्राप्त होताच दोषी पोलिसांवर निलंबन किंवा तडकाफडकी बदलीची कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामध्ये गुन्हे शाखेतील (डीबी) तिघा पोलिसांचा समावेश असल्याची चर्चा पोलीस दलात आहे. नातेवाइकांच्या कामासाठी थोडगे हे करवीर पोलीस ठाण्यात १५ जुलैला आले असता त्यांना पोलिसांनी ठाण्याच्या आवारात मारहाण केली होती. या घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटले. सामाजिक संघटनांनी हे प्रकरण ताणून धरले. मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली. या घटनेचे गांभीर्य पाहून अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या प्रकरणाचा तपास किसन गवळी यांच्याकडे दिला. गवळी यांनी थोडगे, त्यांचे सहकारी सुरेश शिंदे, तसेच मारहाणीचा आरोप असलेले संशयित कॉन्स्टेबल सुमित पाटीलसह तिघे पोलीस व प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असलेले ठाणे अंमलदार, मदतनीस कॉन्स्टेबल, वायरलेस विभागाच्या महिला कॉन्स्टेबल यांचे जबाब घेतले.
दरम्यान, मारहाण करणाऱ्या पोलिसांना हे प्रकरण चांगलेच शेकणार असे दिसताच त्यांनी राजकीय वजन वापरण्याचा प्रयत्न केला. या हस्तक्षेपामुळे हे प्रकरण तब्बल पाच महिने लांबणीवर पडले. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक गवळी यांनी केलेल्या तपासामध्ये संबंधित पोलीस दोषी असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा चौकशी अहवाल ते पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांना सादर करणार आहेत.
घटनाक्रम
‘लोकमत’कडून पाठपुरावा
‘थोडगे मारहाण प्रकरणाचा अहवाल गायब?’ असे वृत्त प्रसिद्ध होताच पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. घटनेच्या सुरुवातीपासूनच ‘लोकमत’ने पाठपुरावा केल्याने हे प्रकरण तडीस गेले.
बंकट थोडगे प्रकरणाचा चौकशी अहवाल दोन दिवसांत माझ्याकडे सादर होईल. त्यानंतर दोषी पोलिसांवर कठोर कारवाई केली जाईल.
- डॉ. मनोजकुमार शर्मा,
पोलीस अधीक्षक