पुणे-बंगळूर महामार्गावर अपघातात पाच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 02:49 PM2019-06-02T14:49:56+5:302019-06-02T18:09:43+5:30
ट्रक आणि कारमध्ये धडक होऊन पुणे-बंगळूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच ठार झाले आहेत.
कोल्हापूर : ट्रक आणि कारमध्ये धडक होऊन पुणे-बंगळूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार झाले आहेत. आज दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे.
महामार्गावर भरधाव निघालेल्या कारचा टायर फुटला. त्यामुळे कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावरून दुसऱ्या बाजूला रस्त्यावर गेली. यावेळी समोरून येणाऱ्या ट्रकची व कारची धडक होऊन कारमधील पाच जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास बेळगाव जवळील महामार्गावर श्रीनगर गार्डनजवळ हा अपघात घडला.
नंदू पवार (28),अमोल नेवे (26), सुरेश कणेरी (29), अमोल चौरी (26),महेश चौरी (28) सर्वजण रा.औरंगाबाद अशी मृतांची नावे असून अन्य दोघे गंभीर जखमी आहेत त्यांची नाव कळू शकली नाहीत. त्यांच्यावर बेळगावातील के एल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते गोव्याकडे जात होते त्यावेळी हा अपघात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादहुन कारमधून सहा जण बंगळूरला निघाले होते. कार श्रीनगर गार्डनजवळ आली तेव्हा समोरील टायर फुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ती दुभाजककावरून पलीकडील रस्त्यावर गेली. यावेळी धारवाडहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रकला कारची जोरदार धडक बसली. धडक जबरदस्त असल्याने कारमधील पाच जण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त बीएस लोकेश कुमार, वाहतूक व गुन्हे विभागाच्या डीसीपी यशोदा वंटगोडी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव वाहतूक उत्तर विभाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.