चालकाचा ताबा सुटल्याने कार नदीत कोसळून सांगलीचे तिघे ठार, रिसेप्शन संपवून परतताना दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 12:06 PM2024-11-29T12:06:44+5:302024-11-29T12:07:09+5:30
सर्व मृत सांगलीचे; तीन गंभीर जखमी
जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : कृष्णा नदीवरील उदगाव-अंकली पुलावरून कार थेट नदीत कोसळून पती-पत्नीसह तरुणी जागीच ठार तर तिघेजण गंभीर झाले. बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास लग्नाच्या रिसेप्शनचा कार्यक्रम आटोपून परतताना जुन्या पुलावर कार चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.
प्रसाद भालचंद्र खेडेकर (वय ४०), प्रेरणा प्रसाद खेडेकर (वय ३६, दोघे रा. मारुती रोड गावभाग, सांगली) व वैष्णवी संतोष नार्वेकर (वय २१, रा. आकाशवाणी केंद्राजवळ, सांगली) अशी मृतांची नावे असून, समरजित प्रसाद खेडेकर (वय ६, रा. मारुती रोड गावभाग, सांगली), वरद संतोष नार्वेकर (वय २१) व साक्षी संतोष नार्वेकर (वय ४०, दोघे रा. गंगाधरनगर, गुरुकृपानगर, सांगली) हे तिघेजण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली आहे. दरम्यान, या अपघातप्रकरणी कारचालक मृत प्रसाद खेडेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबतची तक्रार वरद नार्वेकर यांनी दिली.
वरद नार्वेकर यांच्या नातेवाईकाचे लग्न बुधवारी कोल्हापूर येथे होते. संध्याकाळी सात वाजता हॉटेल पॅव्हेलियन याठिकाणी रिसेप्शन ठेवण्यात आले होते. हा कार्यक्रम आटोपून रात्री साडेअकराच्या सुमारास सर्वजण कारमधून सांगलीकडे परतत होते. कार चालविणारेे प्रसाद यांना झाेप येत असल्याने त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने चारचाकी वाहन थेट उदगाव-अंकली येथील कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून शंभर ते दीडशे फुट खाली कोसळले. या अपघातात प्रसाद खेडेकर, प्रेरणा खेडेकर, वैष्णवी नार्वेकर हे जागीच ठार झाले. तर समरजित खेडेकर, संतोष नार्वेकर, साक्षी नार्वेकर हे तिघेजण गंभीर जखमी झाले.
पुलावरून कार खाली कोसळल्यामुळे वाहनाचा चक्काचूर झाला आहे. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सुरुवातीला सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी सकाळी क्रेनच्या साहाय्याने चारचाकी वाहन बाहेर काढण्यात आले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक नितीश खाटमोडे-पाटील, पोलिस निरीक्षक सत्यवान हाके, पोलिस उपनिरीक्षक विशाल जगताप, पोलिस कर्मचारी विजय पोवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
एकाच ठिकाणी तीनवेळा अपघात
सांगलीकडे जाणाऱ्या कृष्णा नदीवरील या जुन्या पुलाजवळ दोनवेळा संरक्षक पाईपला धडकून कार कोसळल्याची घटना घडली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र अपघात झालेल्या ठिकाणी उपाययोजना राबविण्यात आलेल्या नाहीत. बुधवारी रात्री याच ठिकाणी पुन्हा कार कोसळून तिघांना जीव गमवावा लागला.
दहा मिनिटांत येतो.. शेवटचा निरोप
अंकली पुलावरील अपघात चालकाच्या डुलकीमुळे झाल्याचे जयसिंगपूर पोलिसांनी सांगितले. प्रसाद हे कुटुंबासह तीन दिवसांपूर्वी कोल्हापूरला गेले होते. बुधवारी रात्री सांगलीला परतताना दोन गाड्या पाठोपाठ येत होत्या. एका गाडीत प्रसाद खेडेकर, पत्नी प्रेरणा, बहीण साक्षी, भाची वैष्णवी, भाचा वरद, मुलगा समरजित असे सहा जण होते. रात्रीचा प्रवास असल्याने दोन्ही गाड्यांतील नातलग मोबाइलवरून सतत परस्परांच्या संपर्कात होते. प्रसाद यांची गाडी पुढे, तर दुसरी गाडी मागे होती. दुसरी गाडी पथकर नाक्याजवळ आल्यानंतर त्यांचा शेवटचा संपर्क झाला. प्रसादने १० मिनिटांत येतो असे सांगितले. त्यानंतर दुसरी गाडी प्रसादला ओव्हरटेक करून पुलावरून सांगलीकडे गेली. ती सांगलीत पोहोचल्यावर पुन्हा एकदा फोन केला, मात्र प्रसाद किंवा गाडीतील अन्य कोणी फोनला प्रतिसाद देत नसल्याचे पाहून नातेवाईक परत मागे पुलावर आले. तेव्हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले.
एकुलत्या मुलाचा मृत्यू
प्रसाद खेडेकर यांचा सांगलीत गवळी गल्ली परिसरात दागिने घडविण्याचा व्यवसाय आहे. ते कुटुंबात एकुलते एक होते. त्यांच्या कुटुंबात आई-वडील आहेत. आरवाडे हायस्कूलच्या पिछाडीस नरसोबा बोळात त्यांचे घर आहे. त्यांची बहीण साक्षी नार्वेकर या सांगलीतच कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्राजवळ राहतात. त्यांचाही गणपती मंदिर परिसरात कारागिरीचा व्यवसाय आहे. अपघातानंतर सराफ कट्टा परिसरात हळहळ व्यक्त होत होती.