निलेवाडीत महापुराच्या धास्तीने तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:21 AM2021-07-25T04:21:38+5:302021-07-25T04:21:38+5:30
नवे पारगाव : वारणेच्या महापुराच्या धास्तीने निलेवाडी (ता. हातकणंगले) येथे तिघांचा मृत्यू झाला आहे. अख्खा गावच महापुराच्या विळख्यात व ...
नवे पारगाव : वारणेच्या महापुराच्या धास्तीने निलेवाडी (ता. हातकणंगले) येथे तिघांचा मृत्यू झाला आहे. अख्खा गावच महापुराच्या विळख्यात व स्थलांतरित झाल्यामुळे तिन्ही मृतदेहांचे त्यांच्या अंगणातच गावकर्यांनी अंत्यसंस्कार आटोपले. अविनाश शंकर जाधव (वय ६२), रेखा शंकर पाटील (वय २८) व पांडुरंग बाबू घाटगे (वय ८०) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
शनिवारी सकाळपासून दोन बोटींतून व दुपारनंतर एनडीआरएफच्या बोटीतून गावकऱ्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. पावसाने थोडी उसंत दिल्यामुळे वारणेची पाणीपातळी पाच फुटाने कमी झाली आहे. प्राप्त माहितीनुसार निलेवाडीत सध्या ३० जनावरे दगावली असून, २३ घरांची पडझड झाली आहे.
दरम्यान, शनिवारी निलेवाडीतील पूरग्रस्तांची माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राजू आवळे, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, हातकणंगलेचे सभापती डॉ. प्रदीप पाटील, तहसीलदार प्रदीप उबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजीराव पाटील यांनी भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
२४ निलेवाडी फोटो
फोटो ओळी : महापुराच्या संकटामुळे निलेवाडी (ता. हातकणंगले) येथील बहुसंख्य जनावरांचे बंगल्याच्या टेरेसवर स्थलांतर करून बळीराजाने आपले पशुधन जपले आहे. (छाया : दिलीप चरणे)