सुरक्षारक्षकाच्या गोळीबारात तीन ठार; दोन जखमी
By admin | Published: March 2, 2016 01:41 AM2016-03-02T01:41:49+5:302016-03-02T01:42:44+5:30
‘रत्नागिरी गॅस’ परिसरातील घटना : पत्नीसह स्वत:वरही गोळ्या झाडल्या; मृतांमध्ये कोल्हापूरच्या अधिकाऱ्याचा समावेश
चिपळूण/गुहागर : अधिकाऱ्याशी झालेल्या वादावादीतून चिडलेल्या सुरक्षारक्षकाने केलेल्या गोळीबारात दोनजण ठार झाले. यानंतर स्वत:ला कोंडून घेतलेल्या सुरक्षारक्षकाने स्वत:च्या पत्नीलाही गोळ्या घालून ठार केले आणि स्वत:ही गोळी झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या गोळीबारात त्याच्यासह दोघेजण जखमी झाले असल्याचे समजते. मात्र, याबाबत अधिकृतपणे काहीही समजत नव्हते.
मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड (पूर्वीची दाभोळ कंपनी) परिसरातील गार्ड हॉस्टेलजवळ ही थरारक घटना घडली. यामुळे गुहागर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस पॉवर प्रोजेक्ट लिमिटेडमध्ये ‘सीआयएफ’चे सुरक्षारक्षक आहेत. त्यांच्यासाठी कंपनी परिसरातच हॉस्टेल आहे. या हॉस्टेलमध्ये मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास गौडनामक सुरक्षारक्षकाची शिंदे नावाच्या एका अधिकाऱ्याशी वादावादी झाली. हा वाद सोडविण्यासाठी त्याचे काही सहकारीही तेथे जमले. मात्र, ही वादावादी इतकी विकोपाला गेली की, गौड याने आपल्या जवळील बंदुकीने अधिकाऱ्याच्या दिशेने थेट गोळीबार केला. यात अधिकारी शिंदेसह दोघेजण ठार झाले, तर एक जखमी झाला.
या घटनेनंतर गौड याने स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले. ही घटना घडताच कंपनी परिसरात एकच खळबळ उडाली. तातडीने गुहागर पोलिसांना कळविण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक विनीत चौधरी सहकाऱ्यांसह त्वरीत घटनास्थळाकडे रवाना झाले. गौड याच्या बंदुकीत आणखी गोळ्या असल्याच्या संशयाने त्याला बाहेर काढण्याचा किंवा ताब्यात घेण्याचा प्रयत्न कोणी केला नव्हता.
अकरा वाजण्याच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, शरण न येता आपल्या सात महिन्याची गर्भवती असलेल्या पत्नीची ढाल करून तो खोलीबाहेर आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच त्याने पत्नीवरही गोळी झाडली. त्यानंतर स्वत:ही गोळी झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पत्नीही ठार झाली असल्याचे सांगण्यात आले. गौड गंभीर जखमी असून त्याला आणि अन्य एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे समजते.
या घटनेतील मृत अधिकारी शिंदे हा कोल्हापूरचा असल्याचे समजते. वादावादीचे कारण समजू शकले नाही. या घटनेनंतर कंपनीच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेबाबत मध्यरात्रीपर्यंत अधिकृतपणे पोलीस सूत्रांकडून काहीही सांगण्यात आलेले नव्हते. घटनास्थळी गौड याने कोणत्या
कारणावरून हा गोळीबार केला याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)