मुगळी येथे भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:20 AM2021-06-04T04:20:18+5:302021-06-04T04:20:18+5:30

गडहिंग्लज तालुक्यातील घटना : मृतात नांगनूरच्या दोन महिला व एका पुरुषाचा समावेश गडहिंग्लज / नूल : पावसापासून बचाव करण्यासाठी ...

Three killed as wall collapses at Mughli | मुगळी येथे भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

मुगळी येथे भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

Next

गडहिंग्लज तालुक्यातील घटना : मृतात नांगनूरच्या दोन महिला व एका पुरुषाचा समावेश

गडहिंग्लज / नूल : पावसापासून बचाव करण्यासाठी पोल्ट्री शेड भिंतीच्या आडोशाला थांबलेल्या तिघांवर जोरदार वाºयामुळे पोल्ट्री शेडची भिंत अंगावर पडून तिघांचाही दुर्दैवी अंत झाला. या घटनेत अजित अर्जुन कांबळे (वय ४८), गिरिजा संदीप कांबळे (वय ४५) व संगीता बसाप्पा कांबळे (वय ४५, सर्वजण रा. नांगनूर, ता. गडहिंग्लज) यांचा जागीच मृत्यू झाला. मुगळी (ता. गडहिंग्लज) नजीक दुपारी तीनच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.

अधिक माहिती अशी, नांगनूर येथील गिरीजा हिचा हरळी येथील संदीप कांबळे यांच्याशी विवाह झाला होता. दोन वर्षांपूर्वी संदीप यांचे निधन झाले आहे. पतीच्या निधनानंतर त्या आपल्या दोन मुलांसह माहेरीच राहत होती.

गुरूवारी (३) रोजी गिरिजा ही आपला चुलत भाऊ अजित व चुलत वहिणी संगीता यांना सोबत घेवून हरळी येथील आपल्या आजारी सासूला पाहण्यासाठी आल्या होत्या.

दरम्यान, सासूला पाहून दुपारी पुन्हा गावी परत जात होते. यावेळी मुगळीनजीक आले असता जोरदार वारा व पाऊस सुरू झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी तिघेही माने वसाहतीजवळ असणा-या भीमा माने यांच्या पोल्ट्रीच्या भिंतीचा आसरा घेतला. मात्र, जोरदार वा-यामुळे सिमेंट काँक्रीटची भिंत कोसळली. त्यामुळे भिंतीखाली सापडून तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, मुगळीचे सरपंच बसय्या स्वामी, पोलीस पाटील अनिल महाडीक यांनी भेट देवून पाहणी केली.

--------------------------

* कुटुंबीयांना जबर धक्का..!

अजित हा अविवाहित होता. त्यांचा मोठा भाऊ बसाप्पा यांचा माल वाहतुकीचा व्यवसाय आहे. बसाप्पा हे अर्धांगवायुमुळे तर बसाप्पा यांचे वडील अर्जून हे वयोवृद्धामुळे अंथरूणावर खिळून आहेत. बसाप्पा यांना ७ मुली असून मोठ्या मुलीचा विवाह झाला आहे. वडील व भाऊ यांच्या आजारपणामुळे कुटुंबांची संपूर्ण जबाबदारी अजित व त्यांची वहिणी संगीता यांच्यावरच होती. मात्र, कर्ता भाऊ व पत्नीच्या दुर्देैवी मृत्यूने बसाप्पा व त्यांच्या सातही मुलींना जबर धक्का बसला आहे.

--------------------------

* मुले झाली अनाथ..!

गिरिजा ही एकुलती एक होती. तिच्याही आई-वडीलांचे निधन झाले आहे. दोन वर्षांपूर्वी पतीच्या निधनानंतर ती माहेरी मुलगा ओंकार व सौरभ यांच्यासह राहत होती. वडिलानंतर मुलांना आईचाच आधार होता. मात्र, नियतीने आईलाही हिरावून नेल्याने गिरिजा यांची दोनही मुले अनाथ झाली आहेत. तर आई, चुलत मामा व चुलत मामींचा एकाचवेळी दुर्देैवी मृत्यू झाल्याने त्यांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.

--------------------------

* गिरिजा कांबळे : ०३०६२०२१-गड-०६ न्यू

* संगीता कांबळे : ०३०६२०२१-गड-०७ न्यू

* अजित कांबळे : ०३०६२०२१-गड-०८ न्यू

--------------------------

फोटो ओळी : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील याच भिंतीखाली सापडून नांगनूरच्या तिघांचा दुर्देैवी अंत झाला.

क्रमांक : ०३०६२०२१-गड-०९

Web Title: Three killed as wall collapses at Mughli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.