तीन लाख भाविक अंबाबाई चरणी
By admin | Published: October 8, 2016 12:53 AM2016-10-08T00:53:17+5:302016-10-08T00:53:57+5:30
दर्शनासाठी उच्चांकी गर्दी : आज व उद्या सर्वाधिक भाविक येण्याचा अंदाज
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या गेल्या सहा दिवसांतील उच्चांकी गर्दी शुक्रवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराने अनुभवली. शुक्रवार हा देवीच्या उपासनेचा वार असल्याने कोल्हापूरसह बाहेर गावच्या भाविकांच्या रांगाच्या रांगा मंदिर परिसरात लागल्या होत्या.नवरात्रौत्सवाचे आता चार दिवस राहिले आहेत. त्यामुळे मंदिरात भाविकांचा ओघ वाढू लागला आहे. शुक्रवारी पहाटेपासून मंदिराबाहेर मुख्य रांगांसह मुखदर्शनाच्या रांगाही लागल्या होत्या. सकाळी साडेअकराच्या दरम्यान विद्यापीठ दरवाजा येथील मुखदर्शनाची रांग भवानी मंडपातील जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या बाहेर गेली होती. गाभारादर्शनाची महिलांची मुख्य रांग भवानी मंडपात होती; तर पुरुषांची रांग भाऊसिंगजी रोडपर्यंत गेली होती. घाटी दरवाजा येथील रांगा जोतिबा रोडपर्यंत गेल्या होत्या. संध्याकाळी सात वाजेपर्यंत डोअर मेटल डिटेक्टरवर २ लाख ८१ हजार भाविकांची नोंद झाली. दुसरा शनिवार सुटी व रविवारी अष्टमी असल्यामुळे सर्वाधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.