एका दिवसात तीन लाख भाविक अंबाबाई चरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:35 AM2018-10-15T00:35:09+5:302018-10-15T00:35:24+5:30

कोल्हापूर : सलग दोन दिवस जोडून आलेल्या सुट्ट्यांचा योग साधत देशभरातील भाविकांनी करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी रविवारी कोल्हापूर ...

Three lakh devotees of Ambabai Charan in one day | एका दिवसात तीन लाख भाविक अंबाबाई चरणी

एका दिवसात तीन लाख भाविक अंबाबाई चरणी

googlenewsNext

कोल्हापूर : सलग दोन दिवस जोडून आलेल्या सुट्ट्यांचा योग साधत देशभरातील भाविकांनी करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी रविवारी कोल्हापूर गाठले. गेल्या पाच दिवसांच्या गर्दीची आकडेवारी मोडीत काढत एका दिवसात तब्बल तीन लाखांहून अधिक भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. एरवी सुट्टीच्या दिवशी शांत असलेले कोल्हापूरचे रस्ते भाविकांनी गजबजले होते. दुसरीकडे धर्मशाळा, यात्री निवास, हॉटेल्स हाऊसफुल्ल होती, तर पार्किंगच्या जागा कमी पडल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. रात्री उशिरापर्यंत कोल्हापूरला जत्रेचे स्वरूप आले होते.
यंदा नवरात्रौत्सवात एकच रविवार आला आहे. मात्र त्याला दुसऱ्या शनिवारची सुट्टी जोडून आल्याने परस्थ भाविकांनी शनिवारी रात्रीच कोल्हापूर गाठले. अंबाबाई मंदिराचे दरवाजे पहाटे चार वाजता उघडतात; पण तीन वाजताच भाविकांच्या रांगा सुरू झाल्या. सकाळी आठ वाजता वाजता महिला भाविकांची गाभारा दर्शनाची रांग भवानी मंडप ओलांडून एमएलजी हायस्कूलपर्यंत, तर पुरुषांची रांग जोतिबा रोडमार्गे शिवाजी पुतळ्यापर्यंत गेली होती. विद्यापीठ गेट येथील मुखदर्शनाची रांगही भवानी मंडपापर्यंत गेली होती. दुपारी दोन वाजेपर्यंत रांगांची ‘जैसे थे’ स्थिती होती. बाहेर ही स्थिती असताना मंदिरात पाय ठेवायलाही जागा नव्हती. दुपारनंतरही मुख्य दर्शनरांगा भरलेल्याच होत्या. सायंकाळी सात वाजता गाभारा दर्शनाची रांग थोडी कमी झाली; पण मंदिराचा बाह्य परिसर भाविकांच्या अलोट गर्दीने फुलून गेला होता. महाद्वार रोड, ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोड, बिनखांबी गणेश मंदिर, शिवाजी पुतळा, बिंदू चौक, मिरजकर तिकटी या मंदिराशी जोडलेल्या रस्त्यांना जत्रेचे स्वरूप आले होते.
साडेपाचशे भाविकांना वैद्यकीय सेवा
इचलकरंजीहून पायी निघालेले अडीच हजार भाविक रविवारी पहाटे तीन वाजता मंदिराच्या परिसरात पोहोचले. रात्रभर केलेल्या प्रवासाने त्यांना अशक्तपणा आल्याने भवानी मंडपात उभारण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्रात त्यांच्या रांगाच लागल्या. त्यांना सेवा पुरविताना औषधे व ओआरएस कमी पडल्या. अखेर येथील डॉक्टर व व्हाईट आर्मीच्या जवानांनी मंदिर परिसरातील प्रथमोपचार केंद्र उघडून तेथील औषधे आणली. त्यानंतरही दिवसभरात या दोन्ही केंद्रांत मिळून साडेपाचशे भाविकांना वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली; तर जरगनगर येथील प्रमिला कांबळे या महिलेला १०८ अ‍ॅम्ब्युलन्सने ‘सीपीआर’ला हलविण्यात आले.
८० हजार लाडूंची विक्री
भाविकांना प्रसाद म्हणून देवस्थान समितीतर्फे लाडूप्रसादाची विक्री केली जाते. गेल्या चार दिवसांत साठ हजार, तर रविवारी २० हजार लाडंूची विक्री झाली. कळंबा कारागृहाने एक लाख लाडूंच्या कळ्या तयार करून ठेवल्या आहेत.
वाहतुकीची कोंडी
गर्दीमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. मिरजकर तिकटी ते बिंदू चौक-लक्ष्मीपुरी,
शिवाजी पुतळा, न्यू महाद्वार रोड ते पापाची तिकटी, महाद्वार ते ताराबाई रोड या रस्त्यांवर वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. पार्किंग हाऊसफुल्ल झाल्याने भाविक जागा मिळेत तिथे वाहने लावत होते. मात्र वाहतूक पोलीस ही कोंडी फोडत वाहनांसाठी वाट करून देत होते.
सुविधा पडल्या अपुºया
भाविकांसाठी देवस्थान समिती व सेवा संस्थांनी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. मात्र रविवारी झालेल्या गर्दीने या सुविधांचे नियोजनच कोलमडले. त्यामुळे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पार्किं ग या सुविधा अपुºया पडल्याने गैरसोय झाली.
अन्नछत्रात ११ हजार भाविक
परस्थ भाविकांसाठी महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने जेवणाची सोय केली जाते. रविवारी ११ हजार भाविकांनी, तर गेल्या चार दिवसांत मिळून ४० हजार भाविकांनी याचा लाभ घेतला.
अंबाबाई ‘कौमारी माता’ रूपात
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (रविवारी) करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची कौमारी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली; तर रात्री पालखी कुटीच्या आकारात काढण्यात आली. जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीची कमळातील पूजा बांधण्यात आली.‘कौमारी माता’ ही देवी नवकुमाराचे म्हणजेच स्कंदाचे स्त्रीरूप आहे. ही देवता सप्तमातृकांपैकी एक असून तिचा मत्स्यपुराण, महाभारत, देवीमाहात्म्यामध्ये उल्लेख येतो. मत्स्यपुराणानुसार शिवाने अंधकासुराच्या नाशासाठी मातृकांची निर्मिती केली. त्यातील कौमारी ही एक मातृका. देवीमाहात्म्यानुसार महासरस्वती अथवा कौशिकीच्या मदतीला शुंभ-निशुंभांच्या विरोधात ज्या मातृका निर्माण झाल्या, त्यांत कौमारीचा उल्लेख येतो. कुमार स्कंदाची शक्ती म्हणून तिने भाला घेतलेला आहे. मोरपिसांनी सुशोभित, कोंबडा, मोर आणि नागांनी परिवेष्टित असे तिचे स्वरूप आहे.

Web Title: Three lakh devotees of Ambabai Charan in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.