मारहाण करून हवालाचे तीस लाख रुपये लुटले

By admin | Published: July 25, 2016 12:39 AM2016-07-25T00:39:19+5:302016-07-25T00:39:19+5:30

कोल्हापुरातील घटना : तिघा लुटारूंचे शाहूपुरी पोलिस ठाण्याजवळच कृत्य

Three lakh rupees of the cribe looted by the assault | मारहाण करून हवालाचे तीस लाख रुपये लुटले

मारहाण करून हवालाचे तीस लाख रुपये लुटले

Next

कोल्हापूर : येथील व्हीनस कॉर्नर ते शाहूपुरी स्टेशन रोड परिसरातील राधाकृष्ण हॉटेलसमोर मोपेडवरील चालकाला ठोसा लगावून हवालाचे तीस लाख रुपये असलेली बॅग तिघा चोरट्यांनी हातोहात लंपास केली. शनिवारी रात्री नऊ वाजता घडलेल्या लूटमारीमुळे पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. शहरात व शहराबाहेर नाकाबंदी करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता ते मिळून आले नाहीत. सांगलीतील एम. माधव कंपनीचे हवालाचे पैसे घेऊन कंपनीचा कर्मचारी कोल्हापुरात आला असताना ही घटना घडली.
अरुणभाई अमतभाई सुतार (वय ४२, रा. मारुती मंदिर, सांगली, मूळ गाव खेरवाट, ता. म्हैसाना-गुजरात) हे धवलभाई पटेल (रा. सूरत) यांच्या सांगलीतील एम. माधव कंपनीत नोकरी करतात. कंपनीचे दोन कामगार रामभाऊ पटेल व राकेश पटेल असे तिघे मिळून ते भाड्याने खोली घेऊन राहण्यास आहेत. रामभाऊ हा एक महिन्यापूर्वी आपल्या मूळ गावी पिंपल येथे गेला आहे. या कंपनीचा व्यवहार व्यवस्थापक चिंतन पटेल ऊर्फ पिंटू हे पाहतात. या कंपनीमध्ये हवालाच्या पैशांची ने-आण करण्याची जबाबदारी अरुणभाई सुतार यांच्यावर आहे. शनिवारी साडेपाचच्या सुमारास व्यवस्थापक चिंतन पटेल यांनी त्यांना ३० लाख रुपये कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील एम. माधवलाल कंपनीचे व्यवस्थापक निकेश जयंतीलाल पटेल यांच्याकडे पोहोच करण्यासाठी दिले. पैसे प्रवासी बॅगेत घेऊन ते सांगलीहून एस. टी. बसने कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथे रात्री साडेआठ वाजता आले. याठिकाणी त्यांची वाट पाहत निकेश बसले होते तेथून दोघे मोपेडवरून दाभोळकर कॉर्नरमार्गे रेल्वे स्टेशनकडे येत होते.
सुतार यांनी पैशांची बॅग मोपेडच्या फुटरेस्टच्या पुढे ठेवली होती. रेल्वे स्टेशन परिसरातील राधाकृष्ण हॉटेलसमोर आले असता रस्त्याच्या मधोमध स्प्लेंडर मोटारसायकल उभी करून तरुण उभा होता. त्यामुळे निकेश यांनी मोपेडचा वेग कमी करताच पाठीमागून पल्सरवरून आलेल्या दोघा तरुणांपैकी पाठीमागे बसलेल्याने निकेश यांच्या उजव्या कानावर हाताने ठोसा लगावला.
अचानक जोराचा मार लागल्याने ते मोपेडसह खाली पडले. मागे बसलेले सुतारही खाली पडले. यावेळी पैशांची बॅग घेऊन ते तिघे तरुण पसार झाले. अचानक घडलेल्या या प्रकाराने सुतार व निकेश गोंधळून गेले. त्यांनी आरडाओरड केली परंतु नागरिक जमा होईपर्यंत चोरटे पसार झाले होते तेथून त्यांनी थेट शाहूपुरी पोलिस ठाणे गाठले. शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वत्र नाकाबंदी केली; परंतु चोरटे मिळून आले नाही.
पाळत ठेवून केली लूटमार
मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सदर बाजार, विचारेमाळ, कावळा नाका, शिवाजी पार्क येथील काही सराईत गुन्हेगारांची नेहमी ऊठबस असते. ते या परिसरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. निकेश हे सुतार यांची मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाहेर वाट पाहत बसले होते. सुतार कावळा नाकादरम्यान आले त्यावेळी त्यांनी मी पैसे घेऊन आलो आहे, तुम्ही स्टेशनवर या, असा फोन निकेश यांना केला होता. त्यावेळी निकेश यांनी इथेच बाहेर थांबलो असल्याचे सांगितले.
त्यानंतर बसमधून उतरून सुतार निकेशजवळ आले. यावेळी त्यांनी निकेशच्या दोन्ही पायाच्या मध्ये रिकाम्या जागेत बॅग ठेवत पैसे आहेत, लक्ष ठेव, असे म्हटले. त्यांचे हे बोलणे याठिकाणी ऊठबस करणाऱ्या गुन्हेगारांनी ऐकून ही लूटमार झाली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
अंधाराचा फायदा
लुटारूंनी अंधाराचा फायदा घेत निकेश यांना मारहाण करून पैशांची बॅग लंपास केली. अंधार असल्याने त्यांच्या दोन्ही मोटारसायकलींचे नंबरही ओळखता आले नाहीत. या प्रकाराने आम्ही दोघेही भांबावून गेलो होतो. त्यामुळे आम्हाला काहीच सुचत नव्हते. त्या लुटारूंचे वर्णनही या दोघांना सांगता येत नव्हते.
महिन्यात दुसरी घटना : पोलिस असल्याची बतावणी करून कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांच्या व्हॅनसह सुमारे दोन कोटी २२ लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या ऐवजावर दरोडा टाकणाऱ्या लुटारूंचा अद्याप शाहूपुरी पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही. ही घटना ताजी असतानाच दुसरी लूटमारीची घटना घडल्याने नागरिक, व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Three lakh rupees of the cribe looted by the assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.