त्रिसदस्यीय रचनेने उमेदवारांची दमछाक वाढविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:23 AM2021-09-25T04:23:01+5:302021-09-25T04:23:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : महापालिका निवडणूक लढवायचीच या इराद्याने गेल्या वर्षभरापासून गुडघ्याला बाशिंग बांधून आखाड्यात उतरलेल्या अनेक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा : महापालिका निवडणूक लढवायचीच या इराद्याने गेल्या वर्षभरापासून गुडघ्याला बाशिंग बांधून आखाड्यात उतरलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांची त्रिसदस्यीय प्रभाग रचनेने झोप उडवली आहे. मर्यादित प्रभागातच संपर्क ठेवून निवडणुकीसाठी जोडण्या लावू पाहणाऱ्या इच्छुकांना आता भल्या मोठ्या प्रभागात राजकीय सांगड घालावी लागणार आहे. त्यामुळे उमेदवाराचा खर्च आणि प्रचारादरम्यान होणारी ''दमछाक'' वाढणार आहे. यापूर्वी प्रभागात एकसदस्यीय पद्धत होती. त्यामुळे उमेदवार आपल्या सहा ते सात हजार लोकसंख्या असलेल्या प्रभागात लक्ष केंद्रित करत असे. त्यामुळे खर्च करतानाही उमेदवाराकडून ठरावीक भागातच जास्त खर्च केला जात असे. परंतु आता अठरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या प्रभागात प्रचारासाठी उमेदवाराला फिरावे लागणार आहे. एवढा मोठा प्रभाग फिरताना व प्रत्येक मतदाराची माहिती घेताना उमेदवाराची आणि त्याच्या यंत्रणेची पुरती दमछाक होणार आहे. दरम्यान, जे इच्छुक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, अशांनी गेल्या वर्षापासून निवडणुकीची तयारी केली आहे. आपल्या भागात खर्च केला आहे. अनेक कार्यकर्ते सांभाळले आहेत. भागातील प्रत्येकाच्या वाढदिवसाला हजेरी लावली आहे. परंतु आता प्रभाग मोठा झाला असल्याने अन्य दोन प्रभागात त्यांना आपली ओळख नव्याने निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी त्याला त्या भागात काम करावे लागणार आहे. नव्याने मतदारांच्या ओळखी वाढवाव्या लागणार आहेत. कार्यकर्त्यांचे जाळे विणावे लागणार आहे. या सर्व गोष्टी करताना खर्चाचा हातही थोडाफार सैल सोडावा लागणार आहे. दरम्यान, तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे अपक्ष उमेदवारांची संख्याही घटण्याची शक्यता आहे.