सैन्यदलात नोकरीचे आमिष, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:10 AM2020-01-21T11:10:30+5:302020-01-21T11:12:26+5:30
सैन्यदलात शिपाई भरतीचे आमिष दाखवून भरती प्रक्रियेदरम्यान बनावट प्रश्नपत्रिका व एनसीसीचे प्रमाणपत्र देऊन तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी तिघांना सोमवारी अटक केली.
कोल्हापूर : सैन्यदलात शिपाई भरतीचे आमिष दाखवून भरती प्रक्रियेदरम्यान बनावट प्रश्नपत्रिका व एनसीसीचे प्रमाणपत्र देऊन तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी तिघांना सोमवारी अटक केली.
संशयित देवानंद केरबा पाटील (वय २३, रा. मुदाळ, ता. भुदरगड), अकिब सिकंदर हवालदार (२१, रा. मलकापूर, ता. शाहूवाडी), दिलावर मोहम्मद हवालदार (५५, रा. टेकोली, ता. शाहूवाडी) अशी त्यांची नावे आहेत. देवानंद पाटील याला न्यायालयात हजर केले असता २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
या रॅकेटचा म्होरक्या मुख्य सूत्रधार अफझल कासम देवळेकर ऊर्फ सरकार (रा. कडवे, ता. शाहूवाडी), अरविंद लोंढे (रा. कासारवाडी, ता. हातकणंगले) हे दोघे पसार असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
या रॅकेटने भारतीय सैन्य दलामध्ये शिपाईपदावर नोकरी लावतो, आमचा सैन्य दलामध्ये वशिला आहे, असे सांगून इच्छुक उमेदवारांकडून शैक्षणिक कागदपत्रे घेतली आहेत. त्यांनी एनसीसीचे प्रमाणपत्र, सैन्यदलाची प्रश्नपत्रिका यासह अन्य कागदपत्रे बोगस तयार करून त्या उमेदवारांना दिल्या आहेत. त्यांच्याकडून तीन ते पाच लाख रुपये उकळले आहेत.
सुरुवातीला ५० हजार रुपये घेऊन त्यानंतर बोगस प्रक्रिया करून उर्वरित पैसे उकळल्याचे तपासात पुढे येत आहे. त्यांनी ही प्रमाणपत्रे कोठे बनविली, त्यांच्या बैठका कोठे होत होत्या, त्यांच्या टोळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, यादृष्टीने तपास सुरू आहे.
संशयितांच्या मोबाईल कॉल डिटेल्स्वरून मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. या टोळीने अनेक सुशिक्षित तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लुटल्याचे तपासात पुढे येत आहे. मुख्य सूत्रधार अफझल देवळेकर याला अटक झाल्यानंतर संपूर्ण रॅकेट पुढे येणार आहे. त्याचा आम्ही शोध घेत आहोत, अशी माहिती राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी दिली.
राज्यात खळबळ
या रॅकेटकडून कोल्हापूर, कऱ्हाड , सांगली, सातारा, पुणे, मुंबई येथील बेरोजगार तरुणांची फसवणूक करण्यात आली आहे. रॅकेटच्या विरोधात कोल्हापुरात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच राज्यात खळबळ उडाली आहे. अनेक फसवणूक झालेल्या तरुणांनी कोल्हापूर पोलिसांशी फोनवरून संपर्क साधल्याचे समजते.
तक्रारी देण्याचे आवाहन
सैन्य दलासह अन्य शासकीय विभागात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणारा संशयित मुख्य सूत्रधार अफझल देवळेकर या रॅकेटच्या विरोधात ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
देशद्रोहीच्या गुन्ह्याची मागणी
टेंबलाईवाडी येथील ‘आर्मी’ प्रशासनाच्या गोपनीय यंत्रणेच्या रडारवर हे रॅकेट होते. प्रशासनात भरती प्रक्रियेदरम्यान सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करताना काही प्रमाणपत्रे बोगस असल्याचे निदर्शनास आले आहे. काही तरुणांनी प्रशासनाकडे आपले मोबाईल व्हॉटस्अॅपवर आलेल्या प्रश्नपत्रिकेची चौकशी केल्यानंतर ती बोगस असल्याचे आढळून आले. गोपनीय यंत्रणेने या प्रकरणाचा अहवाल आर्मीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला आहे. संशयितांवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असल्याचे समजते.