कोल्हापूर जिल्ह्यातील तीन आमदार ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 05:16 PM2019-11-22T17:16:36+5:302019-11-22T17:17:52+5:30
भाजपचे राज्य सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांना पराभूत करून निवडून आलेल्या प्रकाश आवाडे यांनी आश्चर्यकारकरीत्या भाजपला पाठिंबा दिला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता आवाडे काँग्रेससोबत राहिले असते तर राज्यात त्यांना मंत्रिपद मिळाले असते,
कोल्हापूर : जिल्ह्यातून निवडून आलेले प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि जनसुराज्य शक्तीचे संस्थापक विनय कोरे यांनी सध्या ज्यांना पाठिंबा दिला आहे. तोच कायम ठेवला जाईल, अशी सध्याची राजकीय स्थिती आहे.
भाजपचे राज्य सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांना पराभूत करून निवडून आलेल्या प्रकाश आवाडे यांनी आश्चर्यकारकरीत्या भाजपला पाठिंबा दिला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता आवाडे काँग्रेससोबत राहिले असते तर राज्यात त्यांना मंत्रिपद मिळाले असते, अशी चर्चा आहे; परंतु आवाडे आता गडबड करणार नाहीत असे दिसते; कारण त्यांना सध्या मुंबईपेक्षा दिल्लीतील सत्ता महत्त्वाची आहे; कारण वस्त्रोद्योगाशी संबंधित बहुतांशी निर्णय हे दिल्लीतूनच होत असल्याने ते भाजपसमवेत राहून दिल्लीतील वस्त्रोद्योगाशी संबंधित कामे करून घेण्यावर भर देतील, असे सांगितले जाते.
स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीत असली तरी बंड करून निवडून आलेले राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सत्ता येणार असल्याने आधीच शिवसेनेला पाठिंबा दिला आहे; मात्र त्यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चांगले संबंध राहिले आहेत. आता तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे संयुक्त सरकार येणार असल्याने यड्रावकर यांना काम करताना फार अडचणी येणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
राहिता राहिला प्रश्न आमदार विनय कोरे यांचा. त्यांनी दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातमहायुतीचा भागीदार पक्ष म्हणून प्रवेश केला आणि विधासभेला भाजपची ‘बी’टीम म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात काम केले. महाराष्ट्रात शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस सरकार स्थापन करत असताना कोरे हे तातडीने भाजपची साथ सोडणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे; मात्र ज्या पद्धतीने हे सरकार बनत आहे, ते पाहता कोरे यांच्यासारखा नेता गडबडीने कोणताही निर्णय न घेता संयमाची भूमिका घेईल, असेच सध्या दिसून येत आहे.