आणखी तिघांना अटक
By admin | Published: June 3, 2014 01:06 AM2014-06-03T01:06:14+5:302014-06-03T01:25:31+5:30
दंगल प्रकरण : संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुरावरून झालेल्या दंगलीत वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी काल, रविवारी रात्री उशिरा आणखी तिघा संशयितांना अटक केली. संदीप दत्ताजीराव जाधव (वय ४७, रा. १२१०, उत्तरेश्वर पेठ), मोहन कृष्णराव म्हेतर (५९, रा. १७०१, डी वॉर्ड, शुक्रवार पेठ), अक्षय दीपक पोवार (१९, रा. ८६९, सी वॉर्ड, रविवार पेठ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या तिघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहनांच्या तोडफोडीचे नुकसान सुमारे दहा लाखांपर्यंत गेले आहे. दरम्यान, काल सकाळी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केलेल्या आठ संशयितांची पोलीस कोठडीची मुदत आज, सोमवारी संपली. त्यामुळे आज पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शनिवारी रात्री या आक्षेपार्ह मजकुरावरून शहरात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. याचा उद्रेक होऊन रविवार पेठ, महाद्वार रोड, सोमवार पेठ, आदी भागांतील दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी आठजणांना, तर जुना राजवाडा पोलिसांनी सुमारे १४ जणांना अटक केली होती. तसेच, शाहूपुरी पोलिसांनी कसबा बावडा परिसरात प्रार्थनास्थळावर दगडफेक केल्याप्रकरणी पाचजणांना अटक केली होती. आज या सर्वांची पोलीस कोठडीची मुदत संपली. त्यामुळे या सर्वांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी दिली.(प्रतिनिधी)