उताऱ्यातील बाहुल्यांवर एकाच कुटुंबातील तिघांची नावं, कोल्हापुरातील सादळे-मादळेत भानामतीच्या प्रकाराने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 05:04 PM2023-01-19T17:04:02+5:302023-01-19T17:06:28+5:30
सतिश पाटील शिरोली : विधवा प्रथा बंदीचे ऐतिहासिक पाऊल, मुलानेच विधवा आईचा पुर्नविवाह लावून देत राज्यासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या कोल्हापुरात ...
सतिश पाटील
शिरोली : विधवा प्रथा बंदीचे ऐतिहासिक पाऊल, मुलानेच विधवा आईचा पुर्नविवाह लावून देत राज्यासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या कोल्हापुरात गेल्या काही दिवसापासून भानामतीचे प्रकारांना ऊत आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत तर हे प्रकार आणखीनच वाढल्याचे पाहायला मिळाले. यातच आता पुन्हा एकदा करवीर तालुक्यातील सादळे-मादळे गावात बुटीत उतारा टाकुन उताऱ्यातील बाहुल्यांवर एकाच कुटुंबातील तिघांची नावे लिहिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली.
सादळे मादळे येथील चौकात एका बुटीत उतारा टाकुन उताऱ्यातील बाहुल्यांवर विक्रम पाटील, निलेश पाटील आणि निखिल पाटील यांची नावे लिहून उतारा टाकण्यात आला आहे. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्याची वाटचाल अंधश्रद्धेकडे होऊ लागली की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.
या प्रकारानंतर पाटील कुटुबांतील निखिल यांनी त्या उताऱ्याजवळ जाऊन अशा प्रकारांना घाबरत नाही, आम्ही शिकलेली माणसे आहोत. अजूनही लोक अंधश्रद्धेत जगतात हे योग्य नाही. यातून आम्हाला आणखी ऊर्जा मिळाली. आम्ही चांगली कामे करत राहू. असल्या भोंदूबाबांना आणि अंधश्रद्धेला बळी पडू नका, हा प्रकार निंदनीय असून काही साध्य होणार नसल्याचे सांगितले.