परिचारिकेसह तिघांना अटक
By admin | Published: December 28, 2015 12:19 AM2015-12-28T00:19:32+5:302015-12-28T00:24:42+5:30
डॉक्टर दाम्पत्य खून प्रकरण : सात दिवसांची पोलीस कोठडी
इस्लामपूर : शहरातील जावडेकर चौकात घडलेल्या डॉक्टर दाम्पत्याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी आठ दिवसांच्या तपासानंतर तिघा संशयितांना अटक केली. तिघांना येथील सुट्टीकालीन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुहास भोसले यांनी सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या खूनप्रकरणी आणखी तिघेजण ताब्यात असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. मात्र, रविवारी आठव्या दिवशीही या दुहेरी खून प्रकरणाचे नेमके कारण गुलदस्त्यातच राहिले. अप्पर पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांनी, सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू आहे, दोन दिवसांत खुनाच्या नेमक्या कारणाचा उलगडा होईल, असे स्पष्ट केले.
नीलेश भास्कर दिवाणजी (वय २९, रा. इंदिरा कॉलनी, रस्ता क्रमांक पाच, शिवनगर, इस्लामपूर), परिचारिका सीमा बाळासाहेब यादव (३६, शिवनगर, इस्लामपूर) व अर्जुन रमेश पवार (१९, रा. हनुमाननगर, इस्लामपूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
१९ डिसेंबर रात्री ९ ते १0 च्या सुमारास धरित्री क्लिनिकच्या पहिल्या मजल्यावर डॉ. प्रकाश वामन कुलकर्णी (६२) व त्यांच्या पत्नी डॉ. अरुणा प्रकाश कुलकर्णी (५५) या दाम्पत्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली होती.
घनवट यांचे अभिनंदन..!
अप्पर पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक विश्वनाथ घनवट आणि त्यांच्या पथकाचे विशेष अभिनंदन केले. अत्यंत क्लिष्ट ठरलेल्या या गुन्ह्याचा त्यांनी शास्त्रोक्त पध्दतीने तपास करुन मारेकऱ्यांचा माग काढला आहे. सर्व संशयितांना अटक झाल्यानंतर गुन्ह्याची धक्कादायक व्याप्ती स्पष्ट होईल. येत्या चार दिवसांत आष्टा नाका परिसरातील खून प्रकरणही उघड होईल. जिल्ह्यातील स्थानिक पोलिसांकडून उघडकीस न आलेली खुनाची सात प्रकरणे घनवट यांनी कौशल्य व धाडसाने उघडकीस आणल्याचे पाटील यांनी सांगितले.
हल्ला जेवणापूर्वीच..!
डॉ. प्रकाश व डॉ. अरुणा कुलकर्णी यांच्यावर झालेला निर्घृण हल्ला हा त्यांनी रात्रीचे जेवण करण्यापूर्वीच ९ ते १0 च्या दरम्यान झाला होता. दोघांच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीतून ही बाब स्पष्ट झाल्याचे लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.