सान्वीच्या प्रसंगावधानामुळे वाचले तीन जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 11:51 PM2018-10-07T23:51:06+5:302018-10-07T23:51:24+5:30

Three organisms read by the cataclysm | सान्वीच्या प्रसंगावधानामुळे वाचले तीन जीव

सान्वीच्या प्रसंगावधानामुळे वाचले तीन जीव

Next

सुशांत घोरपडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हैसाळ (जि. सांगली) : काळ अंगात संचारलेल्या प्रदीप विश्वनाथ जगताप (वय ३२, मूळ रा. कवठेगुलंद, ता. शिरोळ) या जावयाने शनिवारी पहाटे यड्राव (ता. शिरोळ) या सासूरवाडीत मृत्यूही लाजावा, असे हत्याकांड घडविले. पत्नी, सासूसह मेहुणा व विवाहित मेहुणीला संपविताना तीन कुटुंबांची वाताहत केली. आई, आजीला पिसाळलेला सावत्र बाप मारत असल्याचे पाहून चिमुकल्या सान्वीने लहान भाऊ गणेशला हाताशी धरले. जवळच झोपलेल्या सहा महिन्यांच्या श्रीधरला उचलून घेत अंधारातच उसाच्या फडाचा आसरा घेतला. तिच्या प्रसंगावधानामुळेच तीन जीव बचावले.
कौटुंबिक वादातून शनिवारी पहाटे प्रदीपने यड्राव येथे पत्नी रूपाली प्रदीप जगताप (वय २७), सासू छाया श्रीपती आयरेकर (५५), मेहुणा रोहित श्रीपती आयरेकर (१७) व मेहुणी सोनाली अभिजित रावण (२४) यांची यंत्रमागाच्या लाकडी माराने हल्ला करून हत्या केली.
प्रदीप व रूपाली या उभयतांचा हा दुसरा विवाह होता. मृत रूपालीच्या पहिल्या पतीची मुलगी सान्वी (वय ११) ही यड्राव येथे आईजवळच राहत होती. डोळ्यामोर सावत्र बापाच्या डोळ्यात संचारलेला मृत्यू पाहून तिने लहान भाऊ गणेशसह मृत सोनालीचा सहा महिन्यांचा मुलगा श्रीधर याला उचलून घेऊन शेतात धूम ठोकली. त्यांनाही संपविण्याचा प्रदीपचा विचार होता. घाबरलेली सान्वी सकाळीच दोन्ही मुलांसह उसातून बाहेर पडली.
आयरेकर यांचे संपूर्ण कुटुंबच संपविण्याचा प्रदीपचा डाव होता. सान्वीच्या प्रसंगावधानामुळे तीन चिमुकले जीव बचावले.
याशिवाय प्रदीपचा दुसरा मेहुणा अभिषेक कामास गेला असल्यामुळे बचावला. यड्राव येथे सासूरवाडीत चौघांची हत्या केल्यानंतर दुसरा मेहुणा अभिषेक ज्या कारखान्यात कामास आहे, तेथे जाऊन प्रदीपने त्यास बाहेर बोलावण्याचा प्रयत्न केला; पण तो कारखान्यातून बाहेर न आल्यानेच बचावला.
अभिजितला अश्रू अनावर
दोन वर्षांपूर्वी सोनालीचा विवाह म्हैसाळ (ता. मिरज) येथील अभिजित रावण याच्याशी झाला होता. बाळंतपणासाठी माहेरी गेलेली सोनाली व सहा महिन्यांचा मुलगा श्रीधर यांना रविवारी अभिजित म्हैसाळ येथे घेऊन येणार होता; पण एका रात्रीत काळाने सोनालीवर घाला घातला, हे सांगताना अभिजितला अश्रू अनावर झाले होते.
पोरके बहीण-भाऊ चुलत मामाच्या ताब्यात
यड्राव : खुनाच्या प्रकरणात मातृछत्र गमावलेल्या श्रीधर रावण या सहा महिन्यांच्या बालकास त्याचे वडील अभिजित रावण (रा. म्हैशाळ, ता. मिरज) यांनी ताब्यात घेतले, तर सान्वी (वय ११) व गणेश (४) या बहीण-भावाला त्यांचे चुलत मामा रूपेश आयरेकर (रा. शिवाजीनगर, निपाणी) यांनी निपाणीला नेले.
चौघांवर अंत्यसंस्कार
मृतांच्या नातेवाइकांनी चौघांच्या पार्थिवांवर इचलकरंजीत पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.
संशयितास कोठडी
इचलकरंजी/यड्राव : संशयित प्रदीप जगताप यास शहापूर पोलिसांनी रविवारी जयसिंगपूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्याला पोलिसांनी शनिवारीच सांगलीत अटक केली होती.

Web Title: Three organisms read by the cataclysm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.