कोल्हापुरात जीबी सिंड्रोमचे आतापर्यंत तीन बळी शाहू मिल परिसरातील, सीपीआरकडून महापालिकेला दक्षतेबाबत पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:06 IST2025-02-22T12:06:01+5:302025-02-22T12:06:48+5:30
परिसरातील पाण्याचे नमुने तपासण्याची गरज

कोल्हापुरात जीबी सिंड्रोमचे आतापर्यंत तीन बळी शाहू मिल परिसरातील, सीपीआरकडून महापालिकेला दक्षतेबाबत पत्र
कोल्हापूर : जीबी सिंड्रोममुळे आतापर्यंत १ जानेवारीपासून कोल्हापूर शहरातील शाहू मिल परिसरातील तिघांचा मृत्यू झाल्याने सीपीआर रुग्णालयाने शुक्रवारी महापालिकेच्या आयुक्तांना याबाबत पत्र देऊन माहिती कळवण्याबाबत सूचना केली आहे. दरम्यान, एका परिसरातील तिघांच्या मृत्यूमुळे या परिसरातील पाण्याचे नमुने तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
पुणे येथेही एकाच परिसरातील जीबी सिंड्रोम रुग्णांची संख्या वाढल्यानंतर तेथील दूषित पाण्यामुळे मृत्यूची संख्या वाढल्याचे निष्पन्न झाले. गेल्या महिन्याभरापासून सीपीआरमधील जीबी सिंड्रोमच्या रुग्णांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सीपीआरमध्ये गेल्या दीड महिन्यात १६ रुग्णांना दाखल करण्यात आले होते. यामध्ये ११ प्रौढांचा समावेश होता. आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून चौघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही ८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या व्हेन्टिलेटरवर एकही रुग्ण नाही.
परंतु जानेवारीपासून मृत्यू पावलेल्या रुग्णांपैकी तिघेजण शाहू मिल परिसरातील आहेत. हे जेव्हा सीपीआरच्या डॉक्टरांच्या लक्षात आले तेव्हा अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी महापालिका आयुक्तांना शुक्रवारी पत्र पाठवले आहे. जीबीएस रुग्णांची माहिती कळवण्याबाबत हे पत्र देण्यात आले असून माहिती आणि पुढील कार्यवाहीसाठी ते सादर करण्यात आले आहे. पुण्यासारखीच परिस्थिती कोल्हापुरात होऊ नये, यासाठी तीन रुग्ण एकाच परिसरातली असल्याने तातडीने सीपीआरने महापालिकेला ही माहिती दिली आहे.