अंबाबाई मंदिरात भाविकाचे पैसे चोरणाऱ्या तिघांना अटक
By Admin | Published: October 4, 2015 12:43 AM2015-10-04T00:43:21+5:302015-10-04T00:43:21+5:30
तीन दिवसांची पोलीस कोठडी
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील कासव मंडपातील गणपतीचे दर्शन घेणाऱ्या भाविकाच्या खिशातील पाच हजार रुपये चोरणाऱ्या कर्नाटकातील तिघा चोरट्यांना शनिवारी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. नागराज परशुराम गोजडे (वय २७, रा. आमीनभावे, ता. हुबळी), शिवराज मारुती बगाडे (२०, रा. आनंदनगर, ता. हुबळी), प्रताप बसवराज दोडामणी (२१, रा. मंटुर रोड, ता. हुबळी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. चोरीचा प्रकार शुक्रवारी (दि. २) दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडला होता.
युवराज दत्तात्रय पाटील (५०, रा. ठिकपुर्ली, ता. राधानगरी) हे शुक्रवारी दुपारी अंबाबाईच्या दर्शनासाठी आले होते. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. मंदिरातील कासव मंडपात गणपतीचे दर्शन घेताना गर्दीचा फायदा घेत पॅँटच्या खिशातील पाच हजार रुपये काढून घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी जुना राजवाडा पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता २० ते २५ वयोगटातील तिघा तरुणांनी पैसे चोरल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक डी. एम. गायकवाड, राजू चव्हाण यांनी मंदिर परिसरात टेहळणी केली असता संशयित तिघे सापडले. त्यांना पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. (प्रतिनिधी)