Kolhapur: आजरा कारखाना निवडणूक: मडिलगे केंद्रावर बोगस मतदान; उद्या निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 04:58 PM2023-12-18T16:58:01+5:302023-12-18T16:58:39+5:30

केंद्राध्यक्ष व उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची

Three persons who voted bogusly were caught at Madilge polling station in Ajara sugar factory elections | Kolhapur: आजरा कारखाना निवडणूक: मडिलगे केंद्रावर बोगस मतदान; उद्या निकाल

Kolhapur: आजरा कारखाना निवडणूक: मडिलगे केंद्रावर बोगस मतदान; उद्या निकाल

आजरा : आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत मडिलगे (ता. आजरा) येथील मतदान केंद्रावर बनावट आधार कार्ड वापरून मतदान करणाऱ्या तीनजणांना पकडण्यात आले. केंद्राध्यक्ष तक्रार देण्यास तयार नसल्याने सभासदांनी मतदान केंद्रातून मतपेट्या घेऊन जाण्यास अटकाव केला. साडेतीन तास मतदान केंद्रातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. अखेर निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांनी केंद्राध्यक्ष पोलिसांत तक्रार दाखल करतील असे सांगितल्यानंतर सभासद शांत झाले.

मडिलगे केंद्रावर सुशीला सुभान कुरळे या मतदानाला येण्यापूर्वीच त्यांचे मतदान करण्यात आले. त्यानंतर मतदान अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा मतदान करण्यास परवानगी दिली. अशीच घटना अन्य चार मतदारांबाबत झाल्यानंतर बोगस मतदान करणाऱ्यांवर पाळत ठेवण्यात आली. संदीप पाटील यांनी बनावट आधार कार्ड वापरून मतदान करणाऱ्या तिघांना पकडून दिले. मात्र, याबाबत केंद्राध्यक्ष तक्रार देण्यास तयार नसल्याने गोंधळाला सुरुवात झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ माळवे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली व पोलिसांत तक्रार नोंद करतील व ज्या सभासदांना तक्रार अर्ज द्यायचा असेल त्यांनी द्यावा असे सांगितले. यावेळी केंद्राध्यक्ष व उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी चाळोबादेव आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन कारवाईची मागणी करण्यात आली.

राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बनावट आधार कार्ड वापरून बोगस मतदान केले आहे. तोतयागिरी करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी भिकाजी गुरव यांनी केली. विरोधकांनी ६०० आधार कार्ड बनावट तयार केली होती. बोगस मतदान केल्याचे पकडलेल्या तिघांनी मान्य केले आहे. ब वर्गातील मतदारांना एका मताचा अधिकार असताना अचानक पाच मतांचा अधिकार देण्यात आला, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अशोक चराटी यांनी केली.

६०.६८ टक्के मतदान

आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत रविवारी ६०.६८ टक्के मतदान झाले. ३२७३९ मतदारांपैकी १९८६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामीण भागात चुरशीने घराघरांतून मतदारांना कार्यकर्ते मतदानासाठी बाहेर काढण्यात आले. आजरा व उत्तूर या शहरी भागात दुपारी मतदानाचा वेग वाढला होता. उद्या, मंगळवारी आजरा पंचायत समितीच्या सभागृहात मतमोजणी पार पडणार आहे.

Web Title: Three persons who voted bogusly were caught at Madilge polling station in Ajara sugar factory elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.