CoronaVirus Lockdown : गावी जाण्यासाठी तीन दिवसांत ३०० फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 03:41 PM2020-03-30T15:41:33+5:302020-03-30T15:43:43+5:30
आमच्या घरात वडिलांची प्रकृती बरी नाही, त्यांना गावाकडे न्यायचे आहे, साहेब काहीतरी करून एक पास द्या, आमचा भाऊ पुण्यात अडकला आहे, त्याला कोल्हापुरात आणायचे आहे, त्यासाठी आम्हाला मदत हवी आहे, अशा सर्वाधिक तक्रारी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या व्हॉटस्अॅप क्रमांकावर गेल्या तीन दिवसांत आल्या आहेत.
प्रवीण देसाई
कोल्हापूर : आमच्या घरात वडिलांची प्रकृती बरी नाही, त्यांना गावाकडे न्यायचे आहे, साहेब काहीतरी करून एक पास द्या, आमचा भाऊ पुण्यात अडकला आहे, त्याला कोल्हापुरात आणायचे आहे, त्यासाठी आम्हाला मदत हवी आहे, अशा सर्वाधिक तक्रारी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या व्हॉटस्अॅप क्रमांकावर गेल्या तीन दिवसांत आल्या आहेत.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. या कालावधीत नागरिकांच्या समस्या, तक्रारी सोडविण्यासह जिल्हा प्रशासनाकडून ५ व्हॉट्सअॅप क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत. पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ही सुविधा केली आहे.
गुरुवारपासून चोवीस तास हा व्हॉटस्अॅप सुविधा कक्ष सुरू आहे. यासाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ३० कर्मचारी काम करीत आहेत. तीन शिफ्टमध्ये याचे नियोजन असून आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन त्यावर कार्यवाही केली जात आहे.
https://www.facebook.com/SatejPatil/videos/202648851038528/
सर्वाधिक तक्रारी या पेशंटला बाहेर नेण्यासाठी किंवा बाहेरून आणण्यासाठी वाहनाकरिता पास मिळावा, तसेच आमचे नातेवाईक पुण्या, मुंबईत अडकले असून, त्यांना आणण्याची व्यवस्था करावी, आदी स्वरूपाच्या आहेत.
हे प्रमाण ५० टक्के इतके आहे. जीवनावश्यक वस्तू (भाजीपाला, किराणा दुकाने, औषध दुकाने) आपापल्या भागात कुठे उपलब्ध होतील, आरोग्याच्या तक्रारी, गॅस सिलिंडर संपले आहे, अशा स्वरूपाच्या तक्रारींचे प्रमाणही २५ टक्के आहे. या तक्रारींबाबत वेळोवेळी पालकमंत्री पाटील व जिल्हाधिकारी देसाई यांना माहिती दिली जात आहे.
नागरिकांना आपल्या तक्रारी व अडचणी ‘व्हॉट्सअॅप’ क्रमांकावर मांडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लोकांना चांगला उपयोग होत आहे. प्रत्येक तक्रारीची नोंद घेऊन त्यांना मदत क रण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
-नितीन बांगर,
नोडल अधिकारी, व्हॉट्सअॅप नियंत्रण कक्ष
असे आहेत व्हॉटस्अॅप क्रमांक
93 56 71 65 63
93 56 73 27 28
93 56 71 33 30
93 56 75 00 39
93 56 71 63 00