नवी पिढी घडविण्यासाठी १५ कोटींचे तीन भूखंड दान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 05:01 AM2019-05-13T05:01:19+5:302019-05-13T05:01:36+5:30
पुण्यातील अनगोळ दाम्पत्याने हडपसर परिसरातील स्वामी विवेकानंद सहकारी औद्योगिक वसाहतीतील २२ हजार चौरस फुटांचे तब्बल तीन भूखंड रयत शिक्षण संस्थेला दान केले आहेत.
- विश्वास पाटील
कोल्हापूर : नुसत्या पदव्या घेऊन आजचा तरुण स्वत:च्या पायावर उभा राहू शकणार नाही. त्यासाठी त्याला व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण मिळायला हवे, या भावनेतून पुण्यातील अनगोळ दाम्पत्याने हडपसर परिसरातील स्वामी विवेकानंद सहकारी औद्योगिक वसाहतीतील २२ हजार चौरस फुटांचे तब्बल तीन भूखंड रयत शिक्षण संस्थेला दान केले आहेत. कर्मवीर अण्णांच्याबद्दल कृतज्ञता आणि सामाजिक उतराई या भावनेतून अनगोळ दाम्पत्याने हा निर्णय घेतला. या जागेची किंमत सुमारे १५ कोटी रुपये होते. या मोक्याच्या जागेवर ‘रयत’तिथे स्किल डेव्हलपमेंट केंद्र सुरू करीत आहे.
डॉ. मालती महावीर अनगोळ (वय ८३, रा. कल्याणीनगर, पुणे) यांचे वडील सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्दचे. बाळगोंड पाटील असे त्यांचे नाव. ते एक्साईज सुपरिंटेंडेंट होते. त्यांना सात बहिणी व तीन भाऊ. त्यांतील मालती या सर्वांत मोठ्या व कोल्हापूरच्या डॉ. साधना झाडबुके या लहान बहीण. ज्या काळात मुलींच्या शिक्षणाचा समाजाने फारसा विचार केला नव्हता, तेव्हा कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेने मालतीताई शिकल्या. जे. जे. स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समधून त्या पदवीधर झाल्या. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य अधिशाखेच्या त्या प्रमुख होत्या. स्टेट बँक म्युच्युअल फंडाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या पतींना पुण्यातील इलेक्ट्रॉनिक्समधील पायोनिअर मानले जाते. गव्हर्न्मेंट कॉलेजच्या पहिल्या बॅचचे ते स्कॉलर होते. त्यांना सोलर ऊर्जेमध्ये खूपच रस होता. त्यासंबंधीचे कोर्सेस सुरू करण्यासाठी त्यांनी ही जागा १९९८ ला घेतली. परंतु वृद्धत्वामुळे ते शक्य झाले नाही; म्हणून कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या एखाद्या चांगल्या संस्थेला ही जागा द्यावी, असे त्यांना वाटत होते. पतीचे हे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. कर्मवीर अण्णांची हीरकमहोत्सवी पुण्यतिथी व ‘रयत’च्या शताब्दी वर्षानिमित्त ही जागा दिल्याबद्दल डॉ. मालती अनगोळ यांचा संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते सातारा येथे नुकताच सत्कार करण्यात आला.
कर्मवीर अण्णांच्यामुळे त्या काळी आमचे शिक्षण झाले; त्यामुळे त्याबद्दलची कृतज्ञता व तरुण मुलांच्या हाताला काहीतरी काम मिळावे यासाठी स्किल डेव्हलपमेंट केंद्र सुरू करावे म्हणून ‘रयत’ला ही जागा दिली. आमचे दान सत्पात्री लागल्याचा आनंद आहे.
- डॉ. मालती अनगोळ, पुणे