कॅनॉलमध्ये बुडून तीन भावंडांचा मृत्यू
By admin | Published: May 22, 2016 12:36 AM2016-05-22T00:36:49+5:302016-05-22T00:36:49+5:30
सदर बझारमधील हृदयद्रावक घटना : कपडे धुण्यासाठी गेल्यानंतरचा प्रकार
सातारा : येथील कण्हेर उजव्या कालव्यामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या लक्ष्मी टेकडी येथील तीन भावंडांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. मृतांमध्ये एका मुलासह दोन मुलींचा समावेश असून, तिघेही सख्खी भावंडे आहेत. या घटनेमुळे लक्ष्मी टेकडी व सदर बझार परिसरावर शोककळा पसरली आहे.
लक्ष्मी शंकर पत्तार (वय ११), उमाश्री शंकर पत्तार (९), संतोष शंकर पत्तार (८, सर्व रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार, सातारा. मूळ रा. पडघानूर, ता. सिंदगी, जि. विजयपूर, कर्नाटक) अशी बुडून मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शंकर पत्तार व पत्नी रेणुका हे दाम्पत्य बिगारी काम करतात. गेल्या वीस वर्षांपासून त्यांचे वास्तव्य लक्ष्मी टेकडी येथे आहे. मुलगी उमाश्री, मोठा मुलगा मंजुनाथ आणि लक्ष्मी हे पडघानूर येथे गावाला आजी-आजोबांकडे राहायला असतात. तसेच मंजुनाथही बिगारीचे काम करतो, तर धाकटा संतोष हा आई-वडिलांकडेच राहायला होता. या मुलांना शाळेला सुट्या लागल्याने त्यांना सांभाळायला रेणुका यांची आई गावावरून आली होती.
दरम्यान, शनिवारी दुपारी ‘कपडे धुण्यासाठी जाते,’ असे आजीला सांगून लक्ष्मी कॅनॉलकडे गेली. तिच्या पाठोपाठ संतोष आणि उमाश्री ही दोघे भावंडेही गेली. लक्ष्मी कॅनॉलच्या काठावर कपडे धूत असतानासंतोष आणि उमाश्री पाण्यात पोहण्यासाठी उतरले; मात्र त्या ठिकाणी भोवरा असल्याने दोघांनाही अंदाज आला नाही. त्यामुळे दोघेही बुडू लागले. हा प्रकार लक्ष्मीच्या निदर्शनास आल्यानंतर तिने पाण्यात उडी मारली. त्या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न करत असतानाच दोघांनीही तिला भीतीने घट्ट मिठी मारली. त्यामुळे तिला काहीच करता आले नाही. काही क्षणातच तिघांनाही आपला जीव गमवावा लागला. ही घटना घडली तेव्हा एक लहान मुलगा कॅनॉलच्या काठावर होता. त्याने हा सर्व प्रकार घरी जाऊन आजीला सांगितला. त्यानंतर सगळ्यांची धावाधाव सुरू झाली. स्थानिकांनी कालव्यात शोधमोहीम सुरू केली. घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर तिघांचे मृतदेह आढळून आले.
...अखेर लक्ष्मीची झुंज ठरली अपयशी
कपडे धुण्यासाठी गेलेल्या लक्ष्मीसोबत तिचे भाऊ संतोष आणि उमाश्री देखील गेले होते. लक्ष्मी काठावर बसून कपडे धूत असतानाच संतोष आणि उमाश्री पाण्यात पोहण्यासाठी उतरले; मात्र भोवऱ्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. यावेळी दोघांना वाचविण्यासाठी अवघ्या अकरा वर्षांच्या लक्ष्मीने पाण्यात उडी घेतली. दोघांनाही बाहेर काढण्याचा ती प्रयत्न करत होती; मात्र घाबरलेल्या दोघांनी तिला मिठी मारल्याने तिघांनाही प्राणाला मुकावे लागले. भावंडांना वाचविण्यासाठी लक्ष्मीने दाखविलेले धाडस वाखणण्याजोगे होते. मात्र, तिची झुंज अपयशी ठरल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.