स्वच्छतेसाठी ‘गडहिंग्लज’च्या तीन सुपुत्रांचा गौरव
By Admin | Published: October 4, 2015 11:22 PM2015-10-04T23:22:41+5:302015-10-05T00:15:55+5:30
स्वच्छ महाराष्ट्र अभियान : मलकापूर, रोहा, चिपळूण, गुहागर झाले हागणदारीमुक्त
गडहिंग्लज : स्वच्छ महाराष्ट्र नागरी स्वच्छता अभियानांतर्गत हागणदारीमुक्त झालेल्या राज्यातील १९ शहरांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबईत झाला. सत्कार झालेले १९ पैकी तीन मुख्याधिकारी गडहिंग्लज तालुक्याचे आहेत. त्यामुळे गडहिंग्लजकरांची कॉलर अभिमानाने ताठ झाली आहे.गतवर्षी केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यातही स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची घोषणा झाली. उघड्यावर शौचास बसण्याचे शंभर टक्के बंद व्हावे हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. राज्यात एकूण २८५ नगरपालिका व नगरपंचायती आहेत. मात्र, त्यापैकी केवळ १९ नगरपालिकांनीच स्वत:हून स्वच्छतेचा संकल्प केला आणि आपले शहर हागणदारीमुक्त झाल्याचे राज्य शासनाला कळविले होते. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीनुसार अहवालानंतर त्या पालिकांचा विशेष प्रशस्तिपत्र देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.‘हागणदारीमुक्त’ नगरीचा मान मिळविलेल्या रायगड जिल्ह्यातील रोहयोचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील व सातारा जिल्ह्यातील मलकापूरचे मुख्याधिकारी राजेंद्र तेली हे दोघेही महागावचे, तर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे हे मांगनूर तर्फ सावतवाडीचे आहेत. गडहिंग्लजच्या या सुपुत्रांनी ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानात गडहिंग्लजचा ठसा उमटविला आहे.
मुख्याधिकारी पाटील यांनी यापूर्वी चिपळूण शहरदेखील हागणदारीमुक्त केले आहे. सध्या ते रोहा येथे कार्यरत आहेत. रोहामध्ये उघड्यावर शौचास बसण्याचा प्रकार त्यांनी पूर्णत: बंद केला आहे. संपूर्ण शहरात कुठेही कचराकुंडी दिसत नाही. दररोज घंटागाड्या फिरवून सुका व ओला कचरा संकलित केला जातो.
मुख्याधिकारी तेली यांनी मलकापूर येथे रानातील वस्त्यांमध्ये १५५ वैयक्तिक शौचालये बांधून घेतली. त्याचबरोबर झोपडपट्टीमध्येही २० सार्वजनिक शौचालये बांधली. गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून जनजागृती केली. चोवीस तास नळपाणी पुरवठ्याचा प्रयोगही त्यांनी यशस्वीरीत्या राबविला आहे.
मुख्याधिकारी शिंगटे यांनीही गुहागरच्या सागरी किनाऱ्यावर उघड्यावर शौचास बसण्याच्या ठिकाणी विद्युतप्रकाशाची सोय करून बाकडी बसविली. त्यामुळे उघड्यावर शौचास बसणे बंद झाले आहे. ९८ वैयक्तिक शौचालये त्यांनी बांधून घेतली आहेत. त्याचबरोबर पर्यटकांसाठीही स्वच्छतागृहे व स्नानगृहे बांधण्याचा त्यांचा मानस आहे. (वार्ताहर)