स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापूर महापालिकेला थ्री स्टार नामांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:36 AM2019-02-27T11:36:24+5:302019-02-27T11:37:39+5:30
कचरा व्यवस्थापनात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेसह पन्हाळा, वडगाव, गडहिंग्लज नगरपालिकांना थ्री स्टार नामांकन मिळाले आहे. येत्या ६ मार्चला नवी दिल्लीत विज्ञान भवनमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. हे नामांकन मिळाल्याचे पत्र मंगळवारी सायंकाळी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले.
कोल्हापूर : कचरा व्यवस्थापनात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेसह पन्हाळा, वडगाव, गडहिंग्लज नगरपालिकांना थ्री स्टार नामांकन मिळाले आहे. येत्या ६ मार्चला नवी दिल्लीत विज्ञान भवनमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. हे नामांकन मिळाल्याचे पत्र मंगळवारी सायंकाळी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले.
गृह आणि नागरी मंत्रालयातर्फे राबविण्यात आलेल्या या मिशनअंतर्गत कोल्हापूरसह जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील २७ पालिकांना हे नामांकन मिळाले आहे. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये राज्यातील १३ पालिकांना नामांकन मिळाले आहे. मात्र, कोल्हापूरचा समावेश नाही.
या मिशनअंतर्गत ३१ जानेवारीला स्वच्छ सर्वेक्षण घेण्यात आले होते. यात कचरामुक्त शहर ठेवण्यासह कचऱ्यावर प्रक्रिया, सांडपाण्याचे व्यवस्थापन, घर टू घर भेट देऊन होणारे संकलन आदीची माहिती केंद्रीय समितीने प्रत्यक्ष पाहणी करून घेतली होती. या मोहिमेंतर्गत ४२३७ स्थानिक स्वराज्य संस्था, ६४ लाख प्रत्यक्ष मिळालेले प्रतिसाद आणि ४ कोटी समाजमाध्यमावरील संदेश यातून हे नामांकन दिले गेले आहे.
नव्या आयुक्तांना मिळणार मान
माजी आयुक्त अभिजित चौधरी यांच्या कालावधीत शहरात स्वच्छ भारत मोहीम ताकदीने राबविण्यात आली. पण त्यांची नुकतीच बदली झाल्याने त्यांच्या जागेवर येणारे नवे आयुक्त एम. एस. कलशेट्टी यांना पुरस्कार स्वीकारण्याची संधी मिळणार आहे. आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर हा पहिला मोठा पुरस्कार स्वीकारण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
प्रशासकीय अनास्था
हे नामांकन मिळाल्याने महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे, तथापि नेहमीप्रमाणे यालाही प्रशासकीय अनास्थेचाच अनुभव आला. महापालिकेत जनसंपर्क विभाग वारंवार आरोग्य विभागाकडून याबाबतची सविस्तर माहिती मागवून घेण्याचा प्रयत्न करत होते, पण नेहमीप्रमाणे आरोग्य अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांचेही फोन स्वीच आॅफ असल्याने अतिरिक्त माहितीही उपलब्ध होऊ शकली नाही.