पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे तीनमजली इमारत भुईसपाट

By admin | Published: January 23, 2016 01:05 AM2016-01-23T01:05:33+5:302016-01-23T01:05:51+5:30

शनिवार पेठेत थरार : शेजारील अपार्टमेंटची पायाखुदाई करताना दुर्घटना

Three-storey building basin is like leaf bungalow | पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे तीनमजली इमारत भुईसपाट

पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे तीनमजली इमारत भुईसपाट

Next

कोल्हापूर : कोल्हापुरातील शनिवार पेठ, साळी गल्लीतील तीनमजली इमारत शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास मोठा आवाज होत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. गुरुवारी मध्यरात्रीपासून या इमारतीला तडे जाऊन आवाज येत होता. या इमारतीतील काजवे कुटुंबीय रात्रीपासूनच बाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळली. मात्र, त्यांच्या प्रापंचिक साहित्याचा इमारतीच्या ढिगाऱ्याखाली चुराडा झाला.
इमारत कोसळल्यानंतर मातीच्या धुरळ्याचा मोठा लोट हवेत पसरल्याने नागरिक सैरावैरा पळत सुटले. काही वेळापूर्वी उभी असलेली इमारत भुईसपाट झालेली पाहून उपस्थित नागरिकांचेही डोळे भरून आले; तर प्रकाश काजवे यांचे कुटुंबीय शोकाकुल झाले. शनिवार पेठेच्या साळी गल्लीमध्ये प्रकाश मोहन काजवे यांनी चार वर्षांपूर्वी तीनमजली घर बांधले. त्यांचा चांदीचा व्यवसाय असल्याने त्यांनी तळमजल्यावर चांदीचा कारखाना सुरू केला होता.
वरच्या दोन मजल्यांवर ते कुटुंबासह राहत होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या घराला लागून बिल्डर करण माने यांच्या अपार्टमेंट बांधकामासाठी पायाखुदाईचे काम सुरू आहे.
गुरुवारी (दि. २१) कामगारांनी जेसीबी यंत्राच्या साहाय्याने काजवे यांच्या घराला लागून सुमारे पंधरा फूट खुदाई केली होती. प्रकाश काजवे, त्यांची पत्नी सुजाता, मुलगा पीयूष, मुलगी निकिता हे जेवण करून झोपी गेले.
मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांच्या घराच्या भिंतींना तडे जाऊन आवाज होऊ लागला. त्यामुळे हे चौघेही झोपेतून उठून भीतीने घराबाहेर आले. पाहतात तर घराच्या पाठीमागील बाजूच्या भिंतींना तडे पडल्याचे दिसले. त्यांनी तेथून बिल्डर माने यांना फोन लावून याची कल्पना दिली. भीतीने मध्यरात्री दोनपासून काजवे कुटुंबीय घरासमोर थांबून राहिले. काजवे यांचे घर कोसळणार असल्याची वार्ता परिसरात पसरताच नागरिकांनी गर्दी केली. घराच्या भिंतींना हळूहळू तडे जाऊन मोठा आवाज येत होता.
कोणत्याही क्षणी इमारत कोसळणार होती. इमारतीसमोरून विजेच्या वाहिन्या गेल्या होत्या. त्यामुळे महावितरणला सांगून या परिसरातील विद्युतप्रवाह बंद केला. नागरिक श्वास रोखून इमारतीकडे पाहत होते. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास मोठा आवाज होत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ही इमारत कोसळली.
या घटनेची वर्दी मिळताच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे, त्यांचे सहकारी, अग्निशामक दलाचे जवान रणजित चिले, तानाजी कवाळे, सर्जेराव लोहार, संग्राम पाटील, शैलेश कांबळे, मंदार कांदळकर, अजित मळेकर, दत्ता जाधव, दत्ता कांबळे, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनीही प्रचंड गर्दी केली होती. करवीरचे तलाठी प्रल्हाद यादव व कोतवाल अस्लम शेख यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. (प्रतिनिधी)


महापौरांनी दिले
चौकशीचे आदेश
इमारत कोसळल्याचे कळताच महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तसेच इमारत मालक काजवे कुटुंबीयांशी चर्चा केली. विकासक करण माने यांनी मंजूर करून घेतलेला इमारतीचा मूळ आराखडा, त्यांनी केलेली खुदाई आणि त्यांच्याकडून झालेले दुर्लक्ष आदी बाबींची चौकशी करावी, आणि त्यासंबंधीचा अहवाल तातडीने आयुक्त व मला द्यावेत, असे आदेश महापौर रामाणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

करण मानेंवर गुन्हा दाखल
साळी गल्ली येथील काजवे यांची इमारत कोसळून ६५ लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी विकासक करण भगवंतराव माने (रा. नागाळा पार्क) यांच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अरुण आबदेव गुजर (रा. रचना अपार्टमेंट, नागाळा पार्क) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार हा गुन्हा नोंद झाला. परवानगीपेक्षा ४ ते ६ मीटरपर्यंत जादा खुदाई करून शेजारील इमारतीला धोका निर्माण करणे असे या गुन्ह्याचे स्वरुप असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Three-storey building basin is like leaf bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.