Crime News in Kolhapur: जगतापनगरमधील तरुणाच्या खून प्रकरणी तिघे संशयित ताब्यात; पूर्ववैमनस्यातून खुनाचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 11:59 AM2023-01-20T11:59:29+5:302023-01-20T11:59:52+5:30
घटनास्थळी दारूचे ग्लास, गांजाच्या पुड्या
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या हद्दीतील जगतापनगर येथे जोतिर्लिंग शाळेजवळ एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली. ऋषिकेश महादेव सूर्यवंशी (२४, रा. गणेशनगर, चंबुखडी, शिंगणापूर, ता. करवीर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयिताना ताब्यात घेतले असून, आर्थिक वाद किंवा पूर्ववैमनस्यातून खून झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.
मृत ऋषिकेश याच्यावर लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यात मारामारीचे दोन गुन्हे दाखल आहेत. स्टेशन रोड येथील एका व्हिडीओ गेम पार्लरमध्ये तो कामाला होता. बुधवारी सायंकाळी साडेसहानंतर तो घरातून बाहेर पडला होता. घरी त्याचे आई-वडील असतात.
जगतापनगर येथील जोतिर्लिंग विद्यामंदिर शाळेजवळ गुरुवारी सकाळी काही शालेय मुले खेळत होती. खेळताना त्यांचा बॉल ओढ्याकडे गेला. बॉल आणण्यासाठी गेलेल्या मुलांना एक मृतदेह दिसला. मुले आरडाओरडा करीत शाळेकडे पळाली. त्याचवेळी शाळेजवळ राहणाऱ्या एका महिलेने मुलांकडे चौकशी केल्यानंतर खुनाच्या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी करवीर पोलिसांना फोन करून कळवले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी पंचनामा केला.
मृतदेहाच्या पँटच्या खिशात मिळालेल्या आधार कार्डवरून त्याची ओळख पटली. चाकूने पोटात, छातीवर वार केल्यानंतर हल्लेखोरांनी डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केला. याबाबत मृत ऋषिकेशची आई माधवी महादेव सूर्यवंशी (५०, रा. गणेशनगर, चंबुखडी, शिंगणापूर) यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली असून, दोन तरुणांवर संशय व्यक्त केला आहे.
तातडीने शोध
खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने संशयितांचा शोध सुरू केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि करवीर पोलिसांनी स्वतंत्र पथकांद्वारे दिवसभरात तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. आर्थिक वाद आणि पूर्ववैमनस्यातून खून झाला असावा, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.
घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा
खुनाच्या घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गोरले यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. जयश्री देसाई यांनी तपासाबद्दल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
घटनास्थळी दारूचे ग्लास, गांजाच्या पुड्या
जगतापनगरातील ओढ्याकडेला दाट झाडीत दारूचे तीन ग्लास, काही बाटल्या आणि गांजाच्या पुड्या पडल्या होत्या. काही अंतरावरच ऋषिकेश याचा मृतदेह पडला होता. त्याच्या बाजूला रक्ताने माखलेला मोठा दगड होता, तर बाजूच्या झाडांवर रक्ताने माखलेले हात पुसल्याच्या खुना दिसत होत्या.
दुचाकी, मोबाइल लंपास
घटनास्थळावर पोलिसांना ऋषिकेशची दुचाकी आणि मोबाइल मिळाला नाही. हल्लेखोरांनीच त्याची दुचाकी आणि मोबाइल पळवला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. चौकशीला ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून खुनाचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.