पानसरे हत्येतील ‘त्या’ तिघांची नावे निष्पन्न, अटक संशयितांना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 06:18 PM2019-09-20T18:18:48+5:302019-09-20T18:20:56+5:30
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या स्थानिक ‘त्या’ तिघांची नावे निष्पन्न झाली आहेत. तपासपथक त्यांचा शोध घेत असून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले आहे. त्यांची नावे बंद लिफाफ्यातून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली आहेत.
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या स्थानिक ‘त्या’ तिघांची नावे निष्पन्न झाली आहेत. तपासपथक त्यांचा शोध घेत असून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले आहे. त्यांची नावे बंद लिफाफ्यातून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली आहेत.
‘एसआयटी’ (विशेष तपास पथक)ने अटक केलेल्या तिघा संशयितांच्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. त्यांना शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता नववे सत्र न्यायाधीश एस. एस. राऊळ यांनी तिघांना ४ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानुसार ‘सीपीआर’मध्ये वैद्यकीय तपासणी करून रात्री उशिरा त्यांना पुणे, मुंबईला घेऊन पथक रवाना झाले.
संशयित सचिन प्रकाशराव अंदुरे (वय ३२, रा. जैन मंदिराजवळ, राजबाजार, जि. औरंगाबाद), अमित रामचंद्र बद्दी (२९, रा. हबीब चाळ, जि. हुबळी) आणि गणेश दशरथ मिस्कीन (३०, रा. चैतन्यनगर, जि. हुबळी) या तिघांना ‘एसआयटी’ने ७ सप्टेंबरला अटक केली होती. संशयितांना अंबाबाई मंदिर, पानसरे यांच्या बिंदू चौक कार्यालयाच्या परिसरात तपासासाठी फिरविण्यात आले. १४ दिवस पोलीस कोठडी घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली.
या हत्येमध्ये आणखी तिघांचा समावेश आहे. त्यांची नावे निष्पन्न झाली असून, ती उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली आहेत. पानसरे हत्येपूर्वी सर्व संशयित आरोपींनी बेळगावजवळील किणये येथे पाईप बॉम्बची ट्रायल घेतली. त्यानंतर संशयित अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी यांच्यासह आणखी तिघे कोल्हापुरातून एस.टी. बसने प्रवासात अडीच तासांच्या अंतरावरील जंगलव्याप्त भागात गेले.
या ठिकाणी घनदाट जंगलातील एका शेडमध्ये लक्ष्यावर एअर पिस्तुलावर सराव केल्याची माहिती ‘एस.आय.टी.’च्या तपासात पुढे आली होती. त्या घटनास्थळाला भेट देऊन पथकाने पंचनामा केला. संशयित सचिन अंदुरे याने ती जागा दाखविली. संशयित सचिन अंदुरे याला पुण्याच्या, तर अमित बद्दी व गणेश मिस्कीन या दोघांना मुंबई कारागृहात पाठविण्यात आले.